अहमदपूरच्या कोरोना संशयिताची चाचणी निगेटिव्ह, 13 वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त मॉरिशसला गेला होता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

तेरा वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त मॉरिशसला गेलेला इसम 15 मार्च रोजी अहमदपूरला परत आला. यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी परदेशातून आलेला इसम कोरोना संक्रमित असल्याची शंका बाळगून अहमदपूर पोलिसांना कळवले. पोलिसाने तातडीने त्या इसमास पकडून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या इसमाच्या कोरोना विषयी पुर्ण चाचण्या विज्ञान संस्थान पुणे येथे पाठवल्या. या संस्थेने सदर इसमाच्या कोरोना विषयी सर्व चाचण्या तपासून अहमदपूर ग्रामीण रुग्णालयास पाठवल्या आहेत. त्या इसमाच्या चाचण्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट पाठवला आहे. सदर इसमाला ग्रामीण रुग्णालयाने डिस्चार्ज देऊन घरी पाठवले असल्याचे वैद्यकीय अधिकारी सुरजमल सिंहाते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

गेल्या चार दिवसापासून अहमदपूर तालुक्यातील नागरिक कोरोनाचा संशयित रुग्ण शहरात सापडल्याने भयभीत झाले होते. शहरासह तालुक्यातील नागरिकांत घबराटीचे वातावरण होते. परंतु पुणे येथील रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे समजताच घबराटीचे वातावरण कमी झाले. परंतु येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून साबणाने स्वच्छ हात धुणे, नाक, तोंडावर रुमाल बांधणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आदी उपाय सुचवले असून नागरिकांनी या उपायाची तंतोतंत पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.