संचारबंदीच्या काळातही बुधवारी पाच हजार लोक शहरात दाखल

775

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू होऊन दोन दिवस उलटले. तरीदेखील बाहेरगावाहून संभाजीनगरात दाखल होणाऱ्या लोकांचे लोंढे थांबलेले नाहीत. पुणे, मुंबई नगर, नाशिकसह विविध भागात शहरात मोठ्या प्रमाणावर लोक दाखल होत आहे. गेल्या चोवीस तासात शहरात ४८१८ लोक आले. मनपाच्या स्क्रिनिंग सेंटरवर या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

परदेशातून परतलेल्या सिडकोतील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे दोन आठवड्यांपूर्वी स्पष्ट झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाने विदेशातून तसेच मुंबई पुण्याहून शहरात दाखल होणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विमानतळ, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, गोलवाडी नगरनाका, हर्सूल, केंब्रिज चौक अशा विविध ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर सुरू केले. आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे रेल्वे, एसटी बस बंद झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक व बस स्थानकावरील स्क्रीनिंग सेंटर बंद करण्यात आले आहे. तरीदेखील नगरनाका, केंब्रिज चौक आणि हर्सूल अशा शहराच्या वेगवेगळ्या दिशांना असणारे सेंटर सुरूच आहेत. आता सोमवारपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. तरीदेखील मुंबई, पुणे, नगर आदी ठिकाणांहून शहरात येणाऱ्या लोकांचे लोंढे कायम आहेत. संचारबंदी झुगारून हजारो लोक शहरात दाखल होत आहेत. मंगळवारी शहरात तब्बल १६९२४ लोक दाखल झाले. त्यापाठोपाठ बुधवारी देखील हा ओघ थांबलेला नाही. बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत आधीच्या चोवीस तासात ४८१८ लोक शहरात दाखल झाले. महापालिकेच्या नगरनाका गोलवाडी येथील स्क्रिनिंग सेंटरवर ४१५१, हर्सूल नाका येथे ५२२ आणि केंब्रीज चौक येथील स्क्रिनिंग सेंटरवर १४५ लोकांची स्क्रिनिंग करुन त्यांना शहरात प्रवेश देण्यात आला.

अकरा जण क्वारंटाईन कक्षात
महापालिकेच्या क्वारंटाईन कक्षात बुधवारी आणखी तीन जणांना ठेवण्यात आले. याआधी कलाग्राम आणि इतर ठिकाणच्या क्वारंटाईन कक्षात आठ जण ठेवण्यात आले होते. ही संख्या आता अकरा झाली आहे. या सर्वांना येथे चौदा दिवस ठेवले जाणार आहे. दोन दिवसांपुर्वी जॉर्डन येथून परतलेल्या आठ जणांना गंगापूर येथे क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. तरीही हे लोक मंगळवारी शहरात आले. त्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने या आठही जणांची रवाणगी मंगळवारी कलाग्राम येथे क्वारंटाईन कक्षात केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या