बुलढाणा जिल्ह्यातील एका संशयित व्यक्तीचा अहवाल ‘निगेटीव्ह’, परदेशातून आलेले 57 नागरिक ‘होम क्वारंटाईन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. तसेच संशयित व्यक्तींना बुलढाणा, खामगांव व शेगांव येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात येत आहे. बुलढाणा येथील कक्षामध्ये दाखल दोन संशयित व्यक्तीपैंकी एकाचा नागपूर येथील प्रयोगशाळेतून आलेला अहवाल निगेटीव्ह आला आहे.

घरामध्ये निगराणीखाली असलेल्या नागरिकांमध्ये एका नागरिकाची भर पडली आहे. त्यानुसार सोमवार 23 मार्च 2020 पर्यंत विदेशातून आलेल्या 56 नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच मंगळवार 24 मार्च 2020 रोजी 1 नवीन नागरिकाला त्याच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 57 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच स्त्री रूग्णालय, बुलढाणा येथे दोन व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात बुलढाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दाखल नागरिकाचा स्वॅब नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या संशयिताचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून अन्य एकाचा नमुना नागपूरला पाठविलेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून 77 हिंदुस्थानी नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलढाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलढाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली आहे.