‘या’ देशाचा धोका वाढला; चीन, इटली, इराणहून परतत आहेत नागरिक

9059

जगभरात आता कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉक डाऊन करण्यासह अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या चीन, इटली आणि इराणमधून अनेक नागरिक अजूनही ब्रिटनमध्ये परतत आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक नागरिक परतत असल्याने ब्रिटनचा धोका वाढल्याने ब्रिटनने कोरोना रोखण्यासाठी अद्याप कठोर पावले उचलली नाहीत. त्यामुळे ब्रिटन सरकारवर टीका होत आहे.

चीन, इटली आणि इराणहून ब्रिटनकडे जाणाऱ्या हवाईसेवा सुरू आहेत. गेल्या आठवड्यातही मोठ्या संख्यने अनेकजण ब्रिटनमध्ये आले होते. कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झालेल्या देशातून नागरिक परतत असल्याने त्यांच्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. रोम, बिजींग आणि शांघाईहून आठवड्याभरात अनेक विमाने ब्रिटनमध्ये आली आहेत. त्यातून अनेकजण ब्रिटनमध्ये परतले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी ब्रिटनव्यतिरिक्त इतर युरोपीय देशांनी कठोर पावले उचलली आहेत. युरोपीय युनियनने त्यांच्या देशात परदेशी हवाई उड्डाणे बंद केली आहेत. तसेच परदेशातील कोणत्याही विमानांना येथील विमानतळांवर उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ब्रिटनही पूर्वी युरोपीय युनियनचा सदस्य होता. मात्र, आता युनियनपासून वेगळे झाल्याने त्यांचे नियम ब्रिटनला लागू नाहीत.

ब्रिटीश एअरवेज, ईजी जेट, रयान एअरने इटली आणि ब्रिटनमधील उड्डाणे रद्द केली आहेत. मात्र, इतर देशांचा युकेतील फ्लाइटचा मार्ग बंद करण्यात आलेला नाही. त्यामुळे इतर देशातील एअरलाइन्सचे विमाने ब्रिटनमध्ये उतरत आहेत. इराणहून ब्रिटनसाठी आठवड्याभरात तीन विमाने पाठवण्यात येत आहेत. ब्रिटनमध्ये परदेशी विमानांना मनाई करण्याची मागणी होत आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत नसल्याने सरकारवर टीकाही होत आहे. ब्रिटनमधील काही शहरात बार, रेस्टाँरंट, कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येण्यास मनाई केली आहे. तसेच प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना प्रवासासाठी मनाई करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचे संक्रमण झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसात त्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे ब्रिटनचा धोका वाढला आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस विलगीकरण्यात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, यावर देखरेख ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने या प्रवाशांमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या