सुरक्षारक्षक, वाहनचालक, लिफ्टमनची कोरोना चाचणी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
swab-test-corona-test
प्रातिनिधिक फोटो

दाट वस्त्या, झोपडपट्टय़ा-चाळींपेक्षा मोठी निवासी संकुले, इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्या निवासी संकुलांना, इमारतींना सील करण्यात आले आहे अशी निवासी संकुले, इमारतींमध्ये कामाला असलेल्या सुरक्षारक्षक, वाहनचालक, लिफ्टमन आणि सर्व कामगारांची कोरोना चाचणी करा, अशी सूचना पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये दाट वस्त्या, झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱया रहिवाशांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले असून मोठय़ा गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले आणि इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेक इमारतींमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये दोन किंवा 10 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, अशा इमारती पालिकेने सील केल्या आहेत. या इमारतींमध्ये आता अधिक प्रभावीपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ज्या इमारती पालिकेने सील केल्या आहेत, अशा इमारतींमधील सुरक्षारक्षक, लिफ्टमन, सफाई कामगार, वाहनचालक या सर्वांची कोरोना चाचणी केली जावी, अशी सूचना पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केली आहे.