खासगी संस्था चालकांचा अट्टहास, विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक, कर्मचारी कामावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाच्या आदेशामुळे शैक्षणिकसंस्था बंद करण्यात आलेल्या आहेत. अनेक गोष्टीवर निर्बंध घातलेले असताना लातुरातील संस्थाचालक मात्र शासनाचे आदेश पाळत नसल्याचे दिसून येत आहे. शाळांना सुट्या असल्यातरी कर्मचारी, शिक्षक यांना शाळेत येण्याची सक्ती करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खासगी शिकवणी चालकही कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेत आहेत. गावाकडे परतण्यासाठी विद्यार्थ्यांची बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. खासगी वाहतूकदारांनी भाडे भरमसाठ वाढवलेले आहे.

कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी राज्य शासनाने गांभीर्याने पावले उचलेली आहेत. नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी असे सांगितले आहे. राज्यातील अनेक देवस्थानच्या समितींनी मंदिरे दर्शनासाठी बंद केलेली आहे. शासनाने सक्तीने शैक्षणिक संस्था, मॉल, चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश काढले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध स्तरावर काम होत असताना लातूर जिल्ह्यातील संस्थाचालक मात्र हा विषय अधिक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. शाळांना सुट्टी दिली असली तरी अध्यापनाचे काम करणारे शिक्षक, कर्मचारी यांना मात्र सुट्टी लागू करण्यात आलेली नाही. दररोज शाळेत उपस्थिती लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे खासगी शिकवणी चालकांनीही आपल्याकडे अध्यापनाच्या कामासाठी ठेवलेल्या प्राध्यापक, शिक्षकांना सुट्टी न देता उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. वर्षभराच्या प्रश्नपत्रिका काढणे अशी कामे लावण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

लातूर शहरात शिक्षणासाठी राज्यभरातील विद्यार्थी, त्यांचे पालक राहतात. अनेक विद्यार्थी वसतीगृहामध्ये राहतात. कोरोना इफेक्टमुळे शाळा, महाविद्यालये बंद झालेली असल्याने वसतीगृहे रिकामी झालेली आहे. विद्यार्थी आपआपल्या घराकडे परत जात आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर मोठी गर्दी होत आहे. बाहेर जिल्ह्यात राहणारे, कामगार, कर्मचारी लातूर जिल्ह्यात पुणे, मुंबई, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक, हैद्राबाद आणि इतर ठिकाणांवरुन परत येत असल्याने खाजगी टॅ्रव्हल्स चालकांनी भरमसाठ दरवाढ केलेली आहे. पुणे येथून लातूरसाठी, लातूर येथे पुण्यासाठी 1 हजार ते 1500 रुपये घेण्यात येत आहेत. त्यांच्यावर कोणाचेही  नियंत्रण राहिलेले नाही.

जिल्ह्यातील आठवडी बाजार, चित्रपटगृहे, मॉल, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आलेली असली तरी बाजारपेठेतील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. खरेदीसाठी नागरीकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. हॉटेल, धाबे गर्दीने फुलून गेलेली आहेत. स्वतः दक्षता घेतली पाहिजे ही भावना लोकांमध्ये दिसून येत नाही. आपल्याला काही होणार नाही ही बेफिकीरी सर्वत्र दिसून येत आहे. पुणे येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करावी अशी मागणीही कंही जणांनी केलेली आहे. जिल्ह्यातील देवस्थाने दर्शनासाठी बंद करावीत, केवळ आवश्यक दुकानेच उघडी ठेवावीत इतर दुकानांना सक्तीने बंद करावे अशी मागणीही होत आहे.