
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात एका दिवसात 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारी राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 64 वर पोहोचला आहे. नवीन 12 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर 2 रुग्ण पुण्यातील आहे. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असतानाच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातून एक सकारात्मक बातमी आली. कस्तुरबात उपचार सुरू असलेल्या 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 जणांची प्रकृती सुधारली आहे. पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांची पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 12 ने वाढली आहे. यातील 10 रुग्ण मुंबई आणि 2 पुण्यात आढळले. यातील 9 रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील 8 जण मुंबईचे, तर 1 जण यवतमाळचा आहे. तसेच यामधील 6 जणांचा विदेश प्रवासाचा इतिहास आहे, तर एक जण दिल्ली आणि 1 गुजरात येथून आला आहे. शनिवारी आणखी 10 रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोना रुग्णांचा एकदा 19 वर पोहोचला आहे, अशी माहिती डॉ. दक्षा शहा यांनी दिली. तसेच कस्तुरबा रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयातही स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. लीलावती हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, बीपीटी हॉस्पिटल यांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
…तर लोकल सेवा बंद करावी लागेल
मुंबई, पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले. लोकं कामानिमित्त बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे लोकं बाहेर पडणार नाहीत यासाठी, काही सेवा बंद करण्यावर सरकारने भर दिला. गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल सेवा बंद करावीच लागेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टेस्टिंग लॅब्स वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्य सरकार मेडिकल कॉलेजमध्येही लॅब्स उभारण्यास तयार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना याबाबत विनंती केली आहे. राज्यात लॅब्स वाढवण्याची आवश्यकता आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.






























































