
राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तत्काळ तीन ठिकाणी लॅब सुरू होणार आहेत. मुंबई येथील केईएम व कस्तुरबा रुग्णालयात नव्याने आणखी एक लॅब, पुण्यात बी.जे. मेडिकल कॉलेज या ठिकाणी नवी टेस्टिंग लॅब उद्यापासून सुरू होणार आहे. तर हाफकिनला आणखी दोन लॅब पुढील चार दिवसांत सुरू होतील. धुळे, संभाजीनगर आणि सोलापूरमध्येही लॅब सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरणे मिळणार आहेत. केंद्र शासनाकडून 10 लाख तपासणी किटस् मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका अतीरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके आदी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात 700 व्हेंटिलेटर, 600 आयसोलेशन बेडस् तयार आहेत. खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेड ठेवण बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात 100 आणि वायसीएम रुग्णालयात 60 आयसोलेटेड बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. नायडू रुग्णालयात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाइन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एनआयव्ही संस्थेला भेट दिल्याचे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, एनआयव्ही संस्थेची लॅब 50 ते 60 देशांतील अन्य लॅबशी जोडलेली आहे. येथील संशोधकांशी कोरोना व्हायरसबाबात चर्चा केली. कोरोनाच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. संबधितांची ट्रव्हल हिस्ट्री आणि कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचणी केली जाते. सध्या राज्यात चार ठिकाणी चाचणी लॅब सुरू आहेत. केंद्र शासनाने दहा लाख किटस् ऑर्डर केल्या आहेत. उद्या आणखी तीन ठिकाणी लॅब सू होणार आहेत. तर पुढील चार दिवसांत आणखी पाच लॅब अशा एकूण आठ लॅब लवकच सुरू होणार आहे. खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे आरोग्य मंत्री टोपे यांनी मानले आभार
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सुनील टिंगरे, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे, वैद्यकीय अधीक्षक सुधीर पाठसुते यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. टोपे यांनी रुग्णालयातील रुग्णांची सद्यस्थिती जाणून घेतली व त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याबाबत सूचना केल्या. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका उत्तम सेवा देत असल्याबद्दल टोपे यांनी त्यांना धन्यवाद दिले.
‘होम क्वारंटाइन’चा शिक्का असलेल्यांच्या संपर्कात राहण्यास मनाई
ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे त्या व्यक्तींच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’ असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना 14 दिवस कोणाच्याही संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.

























































