
चीनमध्ये हाहाकार उडवून देणाऱया कोरोना विषाणूने 145 हून अधिक देशांना आपल्या कवेत घेतले आहे. या विषाणूचा क्रीडाविश्वालाही मोठा फटका बसला आहे. क्रिकेटसह 17 खेळांतील 60 हून अधिक स्पर्धा या व्हायरसच्या धाकाने रद्द कराव्या लागल्या आहेत, तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या वर्षीच्या बहुतांश स्पर्धा या मार्च आणि एप्रिलमध्येच होणार होत्या. यात रेसिंग, फुटबॉल, गोल्फ, रग्बी लीग, टेनिस, क्रिकेट, स्नूकर, मोटरस्पोर्टस्, बॉक्सिंग, आईस हॉकी, बेसबॉल, ऍथलेटिक्स, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस अशा विविध खेळांच्या स्पर्धांचा समावेश होता. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यातील बहुतांश स्पर्धा रद्द कराव्या लागल्या, तर काही पुढे ढकलण्यात आल्या. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना शुक्रवारी रिकाम्या स्टेडियममध्ये पार पडला. यात ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी बाजी मारली. मालिकेतील उर्वरित दोन लढती रद्द करण्यात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोकियो ऑलिम्पिकवरच्या आयोजनावरही संदिग्धतेचे काळेकुट्ट ढग जमा झाले आहे.
– फेडरेशन कप (राष्ट्रीय ऍथलेटिक्स) पुढे ढकलण्यात आला.
– बंगळुरूतील फिबा बास्केटबॉल स्पर्धाही पुढे ढकलली.
– सर्व प्रकारच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 31 मेपर्यंत स्थगित.
– रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धाही पुढे ढकलली.
– आयएसएल फायनल प्रेक्षकांविना खेळवणार.
– हिंदुस्थान-कतार फुटबॉल सामना पुढे ढकलला.
– हिंदुस्थान-अफगाणिस्तान फुटबॉल सामनाही पुढे ढकलला.
– संतोष ट्रॉफीतील अंतिम फेरीच्या लढती पुढे ढकलल्या.
– आय लीगच्या उर्वरित लढती प्रेक्षकांविनाच खेळवणार.
रद्द अन् पुढे ढकललेल्या स्पर्धांवर एक नजर
क्रिकेट ः इंग्लंडचा श्रीलंका दौरा रद्द. आयपीएल 2020 स्थगित; 15 एप्रिलनंतर निर्णय. हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका वन डे मालिका रद्द. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड मालिकेतील दोन सामने रद्द.
फुटबॉल ः एप्रिल-मेदरम्यान होणारी एशियन चॅम्पियनशिप लीग पुढे ढकलली. 2022 च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये. चायना सुपर लीग, के लीग व जे लीग स्थगित.
ऍथलेटिक्स ः नानजिंगमध्ये 13 ते 15 मार्चदरम्यान होणारी वर्ल्ड इनडोअर चॅम्पियनशिप वर्षभर पुढे ढकलली.
तिरंदाजी ः शांघायमध्ये 4 ते 10 मेदरम्यान होणारा वर्ल्ड कप रद्द.
बॅडमिंटन ः मनीलामध्ये होणाऱया एशियन टीम चॅम्पियनशिपमधून चीन व हाँगकाँगची माघार.
हॉकी ः 11 ते 18 एप्रिलदरम्यान होणारी अझलन शाह हॉकी स्पर्धा स्थगित. चीन संघाची फेब्रुवारीत बेल्जियमविरुद्ध, तर मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी प्रो लीग रद्द.
गोल्फ ः सिंगापूरमधील महिला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि हैनान आयलॅण्डमधील ब्लू बे एलपीजीए स्पर्धा रद्द.
जलतरण ः एशियन वाटर पोलो चॅम्पियनशिप, डायव्हिंग वर्ल्ड सीरिज रद्द. चीनमधील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा स्थगित.
बास्केटबॉल ः एनबीए सीजनला स्थगिती.
टेबल टेनिस ः वर्ल्ड टीम चॅम्पियनशिप रद्द. दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया ओपन रद्द.
तायक्वाँदो ः चीनमध्ये एपिलला होणारी एशियन ऑलिम्पिक क्वालिफायर आता जॉर्डनमध्ये होणार.
टेनिस ः 13 ते 19 एप्रिलदरम्यान होणारी डब्लूटीए जियान ओपन रद्द.
व्हॉलीबॉल ः चीनमध्ये एप्रिलला होणारा बीच व्हॉलीबॉल वर्ल्ड कप रद्द.
वेटलिफ्टिंग ः कझाकिस्तानमध्ये एप्रिलमध्ये होणारी एशियन चॅम्पियनशिप उझबेकिस्तानला होणार.

























































