
परदेशातून येणाऱ्या हिंदुस्थानींना आता थेट घरी पाठवण्यापूर्वी पवई येथील आयआयटी मुंबईत ठेवले जाणार आहे. आयआयटीतील वसतिगृहे रिकामी करून विद्यार्थ्यांना घरी पाठवले गेले आहे. त्या इमारती जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या असून तिथे परदेशांतून आलेल्या व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे.
परदेशातून आलेल्या ‘कॅटेगरी सी’मधील व्यक्तींना इतरांपासून वेगळे ठेवण्यासाठी मुंबईच्या एका कोपऱयात असलेल्या आयआयटी मुंबईची निवड करण्यात आली आहे. तेथील अनेक इमारतींमध्ये तशी व्यवस्था केली गेली आहे. परदेशातून आलेल्या अशा व्यक्ती ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, पण काही दिवसांनंतर ती दिसू शकतात असा संशय असलेल्या व्यक्तींची गणना ‘कॅटेगरी सी’ मध्ये केली जात आहे.
आयआयटीचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांनी जिल्हाधिकाऱयांच्या या निर्णयाची माहिती ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांना दिल्याचे समजते, मात्र या निर्णयाचा विद्यार्थी आणि शिक्षकवर्गातून विरोध होत आहे. असे केल्याने आयआयटीत राहणाऱया हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱयांनाही धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आयआयटी मुंबईत सुमारे 15 हजार विद्यार्थी राहतात.
या इमारती घेतल्या ताब्यात
वनविहार गेस्ट हाऊस n एच-18 n एच-18ची ‘बी’ विंग n एमटीएनएलचे गेस्ट हाऊस
































































