सावध, ऐका पुढल्या हाका! कोरोनाचा विस्फोट, 24 तासात 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेला, गेला म्हणता म्हणता कोरोना पुन्हा आला असून गेल्या काही दिवसातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यासह देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने देशभरातील निर्बंध हटवण्यात आली होती. मात्र कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने सर्वांनाच धास्ती बसली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून चार हजारांवर रेंगाळणारा आकडा आता 5 हजारांच्याही वर गेला आहे.

देशात गेल्या 24 तासामध्ये 5 हजार 233 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 345 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 7 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

कोरोनाचा आकडा वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही फूगत चालली आहे. 10 हजारांच्याही खाली आलेली रुग्णसंख्या आता 28 हजार 857 वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 24 हजार 715 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आतापर्यंत कोरोना लसीचे 194 कोटी 43 लाख 26 हजार 416 डोस नागरिकांनी घेतले आहेत. तसेच कोरोना वाढत असल्याने बुस्टर डोस घेण्यासाठीही पुन्हा गर्दी होऊ लागलीय.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या हजार पार

राज्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 881 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही उच्चांकी रुग्णसंख्या ठरली आहे. राज्यात 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 इतका आहे. चांगली बाब म्हणजे राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

मास्क सक्ती नाही, पण…

कोरोनाच्या संसर्गाचे हे रुप पाहता सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कारणांनी बाहेर जाणाऱ्या, प्रवास करणाऱ्या, तसेच गर्दीत वावरणाऱ्या नागरिकांना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचे दिसून आल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हे मास्क सक्ती नाही पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले.