श्रीरामपुरातील दोन लाचखोर पोलिसांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तक्रारदारास सहकार्य करण्यासाठी 15 हजारांच्या लाचेची मागणी करून दहा हजारांची लाच घेताना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली. सुनील उत्तमराव वाकचौरे, गणेश हरी ठोकळ अशी या पोलिसांची नावे आहेत.

तक्रारदार व त्याच्या भावात घराची भिंत बांधण्यावरून आपसांत वाद असलेल्या ठिकाणी तक्रारदारास काम करण्यास, तसेच तक्रारदारास सहकार्य करण्याच्या मोबदल्यात 15 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला ऍन्टी करप्शनची घरघर लागली असून, आतापर्यंत चार कर्मचारी जाळ्यात आडकले आहेत. विशेष म्हणजे 26 जानेवारी रोजी हवालदार वाकचौरे यांनी चांगली परेड केली म्हणून अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. मात्र, 27 जानेवारीला रात्री ते ऍन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले. आतापर्यंत पोलीस हवालदार काळे, पोलीस नाईक दुधाडे व सुनील वाकचौरे, गणेश ठोकळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.