
सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीची परदेशात पहिली मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर हिंदुस्थानात या लसीचा दुसरा आणि तिसऱ्या मानवी चाचणीचा टप्पा सुरू झाला आहे. भारती हॉस्पिटलमध्ये पुण्यातील दोनजणांना अर्धा मिली लसीचा डोस देऊन चाचणी सुरू करण्यात आली.
हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारती विद्यापीठ मेडिकल फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता कदम, डॉ. सोनाली पालकर, डॉ. जितेंद्र ओसवाल यावेळी उपस्थित होते. या लसीच्या मानवी चाचणीसाठी पाच निरोगी व्हॉलेंटीअर्सनी नावनोेंदणी केली होती. त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. खबरदारी म्हणून त्यांची मंगळवारी कोविड आरटीपीसीआर चाचणी आणि अॅण्टिबॉडी तपासणी करण्यात आली. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात तिघेजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे पाचजणांपैकी एका 32 वर्षीय आणि 47 वर्षीय पुरुषांनाच लसीचा डोस देण्यात आला.
डॉ. ललवाणी म्हणाले, भारती हॉस्पिटलमध्ये एकूण 350 व्हॉलेंटीअर्सना लस देण्यात येणार असून, त्यासाठी 18 वर्षांवरील निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. त्यापैकी पुढील आठवड्याभरात 25 जणांना लसीचा डोस दिला जाणार आहे. सुरुवातीला निवड झालेल्या पाचपैकी दोघांनाच लसीचा डोस देण्यात आला. त्यामुळे लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे पाहण्यासाठी काही तास हॉस्पिटलमध्ये थांबावे लागणार आहे. पुढील काही दिवस त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे 28 दिवसांनंतर त्यांना पुन्हा लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 90 दिवसांनी या व्हॉलेंटीअर्सनी फोनवरून संपर्क साधला जाईल आणि 180 दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलविले जाईल. त्यामुळे सहा महिन्यांमध्ये लसीच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब होऊ शकेल.
सिरम इन्स्टिट्यूट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका यांच्याद्वारे झालेल्या संयुक्त करारामध्ये या लसीची निर्मिती सिरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने नुकतेच सिरमला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी दिली होती. त्यामुळे अखेर भारती हॉस्पिटलमध्ये या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली.
पुण्यातील 4 वैद्यकीय संस्थांमध्ये लसीची चाचणी
देशात एकूण 17 वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीची चाचणी केली जाणार आहे. यामध्ये पुण्यातील भारती हॉस्पिटल, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय, जहांगीर हॉस्पिटल आणि वडू येथील केईएम हॉस्पिटलचा समावेश आहे.
समाजासाठी काहीतरी करू शकतो…
सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की, लस चाचणीसाठी व्हॉलेंटीअर्स पाहिजेत. त्यानंतर मी भारती रुग्णालयासोबत संपर्क साधला. त्यानंतर माझ्या स्वॅब आणि अॅण्टीबॉडीज तपासणी करण्यात आली. त्या निगेटिव्ह आल्याने बुधवारी मला लस देण्यात आली आहे. मला खूप अभिमान वाटत आहे की, समाजासाठी काहीतरी करू शकत आहे. अशा भावना लस देण्यात आलेल्या तरुणाने व्यक्त केल्या.





























































