कोपरगाव – विहिरीच्या कामात क्रेन तुटल्याने तीन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कोपरगाव

तालुक्यातील चासनळी येथे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू असताना क्रेन तुटल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. त्यात सदर कामाचा ठेकेदार रवी विठ्ठल जाधव (रा खेडले झुंगे, जिल्हा नाशिक) यासह इतर दोन मजुरांचा समावेश आहे, तर जखमी मध्ये तुकाराम देवसिंग पाटील (रा खडका एरंडोल जिल्हा जळगाव) याचा समावेश आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हंडेवाडी शिवारात लबडे यांच्या शेतात क्रेनद्वारे विहीर खोदण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना क्रेन तुटल्याने तीन जण जागीच ठार झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन मयत मजुरांचे नावं समजलेली नाहीत.

गेल्या अनेक दिवसांपासून लबडे यांच्या विहिरीचे काम सुरू होते. ठेकेदार जाधव यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील मजूर आणून हे काम करीत होता.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. वेगळ्या जिल्ह्यांतील मजूर असल्याने त्यांची सविस्तर महिती कळू शकली नाही. लबडे यांना याबाबत विचारले असता मी मुंबई येथे असून ठेकेदाराला काम दिले होते त्यामुळे मला काही माहीत नसल्याचे लबडे यांनी सांगितले.