
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी श्रेयांक (क्रेडिट) पद्धत लागू करण्याच्या सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही क्रेडिट पद्धत लागू केली जाणार आहे. दोन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी 80 ते 88 व्रेडिट विद्यार्थ्यांना मिळवावे लागणार आहेत.
राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांना येत्या दहा दिवसांत या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राला विद्यार्थ्यांना 20 ते 22 क्रेडिट मिळवावे लागतील. यामध्ये पहिल्या वर्षी रिसर्च मेथडॉलॉजी विषयासाठी 4 क्रेडिट आणि आवडीच्या विषयाकरिता विद्यार्थ्यांना 4 क्रेडिट मिळवावे लागतील. नोकरीवरील प्रशिक्षण आणि इंटर्नशिपसाठी एकूण 4 क्रेडिट्स विद्यार्थ्यांना प्राप्त होतील. तर दुसऱया वर्षीही विद्यार्थ्यांना 20 ते 22 क्रेडिट दिले जातील. यात संशोधन प्रकल्पासाठी 10 क्रेडिटचा समावेश असेल.
दरम्यान, नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यानुसार एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. राज्यात 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवणाऱया महाविद्यालयांमध्ये एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी सुरू केली जाणार आहे. 2026-27 पर्यंत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांना एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करता येईल. मात्र तीन वर्षांत पदवी घेऊन बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांना दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची मुभा असेल.


























































