मदनलाल यांचा विराटला थम्स अप; आक्रमक स्वभावाचे केले समर्थन

332

विराट कोहलीच्या फलंदाजीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जातो, पण त्याच्या आक्रमक स्वभावावर कित्येकवेळा टीकाही होते. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू व सध्याच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्य मदनलाल यांनी टीम इंडियाच्या या कर्णधाराच्या आक्रमक स्वभावाचे कौतुक केले आहे.

मदनलाल यावेळी म्हणाले, हिंदुस्थानी संघात आक्रमक स्वभावाचे खेळाडू नाहीत असे सातत्याने म्हटले जात होते. आता विराट कोहलीच्या रूपात आक्रमक स्वभावाचा खेळाडू संघात आलाय तर त्याने शांत रहायला हवे असे म्हटले जाते. जनतेला असे का वाटते तेच समजत नाही, असे मदनलाल यावेळी म्हणाले. मला त्याचा मैदानातील आक्रमक बाणा आवडतो. न्यूझीलंडमध्ये हिंदुस्थानी संघाला (कसोटी व वन डे) अपयशाचा सामना करावा लागला. पण जय-पराजय हा खेळाचाच एक भाग आहे. विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तो झोकात पुनरागमन करील, असे मदनलाल यावेळी ठामपणे सांगतात.

आपली प्रतिक्रिया द्या