
इंडियन प्रीमियर लीग 2022 ची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक बीसीसीआयने निश्चित केल्याची बातमी समोर येत आहे. सलग 2 वर्ष देशाबाहेर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेचा आगामी सीजन हा हिंदुस्थानातच खेळला जाणार असल्याचे समजते आहे.
आयपीएलचे शेवटचे दोन सीजन हे यूएईमध्ये खेळले गेलेत. देशात कोरोना संकटामुळे ही स्पर्धा हिंदुस्थानबाहेर आयोजित करण्यात आली होती. आयपीएल 2022 च्या स्पर्धेत बीसीसीआयने 10 संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात अहमदाबाद आणि लखनौ येथील दोन नवीन संघ सामील करण्यात आले आहेत.
चेन्नईत खेळ जाईल पहिला सामना
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) आयपीएल 2022 च्या तारखा निश्चित केल्या आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 2 एप्रिल रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल. यावेळी 10 संघ असल्याने एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळला जाईल.




























































