Cricket world cup 2019 इस रंग बदलती दुनिया में!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी << [email protected]>>

12 व्या क्रिकेट विश्वचषकाचा पहिला चेंडू टाकण्याचा मान दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहिरला मिळाला. शिवाय दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्ट्रॉ याला तंबूचा रस्ता दाखवत त्याने विश्वचषकातील पहिला बळीही पटकावला.

1983 साली मी वर्ल्ड कपसाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेलो तेव्हा जाण्यापूर्वी मी बॉब महादेवकर या विम्बल्डन पंचाला भेटलो होतो. कारण ते सातत्याने विम्बल्डनसाठी इंग्लंडला जात. माणूस रसिक आणि अवलिया! इंग्लंडच्या त्यांच्या अनुभवाबद्दल सांगून त्यांनी मला एक सल्ला दिला – ‘‘इंग्लिश बायका आणि इंग्लिश कंडिशन्स (इंग्लिश वातावरण) यावर कधी विश्वास टाकू नकोस. दोन्ही गोष्टी अत्यंत बेभरवशाच्या.’’ इतक्या वेळा इंग्लंडला जाऊन माझा इंग्लिश बायकांशी ‘विश्वासघाताची शक्यता असलेल्या’ कुठल्याही बाबीबाबत संबंध आला नाही, पण इंग्लिश वातावरणाला मी इतक्या वेळा रंग बदलताना पाहिलं की, सरडय़ालाही कमीपणा वाटावा. त्यामुळेच फलंदाज किंवा गोलंदाज हा इंग्लिश कंडिशन्समध्ये यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, पण इंग्लिश वातावरण आता बदललंय ना!

moin-ali-vs-hasim-amla

खेळपट्टय़ा तर बदललेल्या वाटतात. आता वर्ल्ड कपची पहिली मॅच झाली. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका. खेळपट्टी हिंदुस्थानातून आयात केल्यासारखी वाटत होती. पूर्वी बऱ्याचदा इंग्लंडमध्ये आऊटफिल्ड आणि खेळपट्टीमधला फरक कळायला डोळे ताणावे लागत. ही खेळपट्टी चक्क बेनस्टोक्स एवढी गोरी वाटत होती. टॅन केलेलं गोरेपण दिसतं तसं दक्षिण आफ्रिकेने चक्क पहिली ओव्हर फिरकी गोलंदाज ताहिरला दिली. अलीकडे फिरकी गोलंदाजीने पहिलं षटक टाकणं ही तोंडात बोटं घालायची गोष्ट राहिलेली नाही, पण तरीही इंग्लंडमध्ये हे घडणे हे खेळपट्टीचे रंगरूप सांगते. मुख्य म्हणजे पहिल्याच षटकात लेगस्पिनर इम्रान ताहिरला गोलंदाजी दिल्यावर इंग्लंडलासुद्धा धक्का बसला. ताहिरने नव्या चेंडूने पहिली दोन षटके अप्रतिम टाकली आणि विकेटही मिळवली. तो दक्षिण आफ्रिकेचा मास्टरस्ट्रोक होता. इंग्लंडमध्ये चेंडूच्या रेषेतून बॅट फिरवणे (थ्रू द लाइन) एरवी कठीण असते. कारण चेंडू सिम होतो. इंग्लिश फलंदाज असे फटके आरामात खेळत होते. खेळपट्टीकडून मूव्हमेंटला अजिबात प्रोत्साहन नव्हते. दक्षिण आफ्रिकेने शेवटची पंधरा-वीस षटकांत तुलनेने चांगली टाकल्यामुळे इंग्लिश धावसंख्या 350 च्या दरवाजावर जाऊन पोहोचली नाही. आणि जून-जुलैमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिसला तर खेळपट्टी पाहून मॅच इंग्लंडमध्ये आहे की हा प्रश्न पडेल, पण पूर्वी असे नव्हते आणि काही बदल होऊ शकतात.

eng-vs-sa1

आपण पृथ्वी, आप (पाणी), अग्नी, वायू आणि आकाशाला पंचमहाभूतं मानतो. आयुर्वेद म्हणतं की, आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलंय. चार्वाक आणि बौद्ध धर्म यातून आकाशाला वगळतात. त्यांना चारच महाभूतं स्वीकारार्ह आहेत. क्रिकेट हे चार महाभूतांनी बनलंय. पृथ्वी, आकाश, वायू आणि पाणी ही चारही महाभूतं इंग्लंडमध्ये खरोखरचं ‘भुता’सारखी वागतात. खेळपट्टीवर गवत ठेवलं आणि आकाशात ढग जमा झाले की, चेंडू भुताटकी वाटावी असा अचानक स्विंग आणि सिम होतो. पावसाला शिंपडून जायची लहर कधीही येऊ शकते. तिथल्या वेधशाळेला पावसाची ‘लहर’ कळते, पण ती मानवाला अजून रोखता आलेली नाही आणि वारा कधी गोलंदाजाला मदत करून जाईल हे सांगता येत नाही.

stokes

मला आठवतंय, 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये ब्राथटनला (‘सागरा प्राण तळमळला’ फेम) मॅच होती. दुपारनंतर जेव्हा श्रीनाथला एका एंडने गांगुलीने आणलं तेव्हा तिथे असलेला ससेक्स काऊंटीचा एक जुना, केस पिकलेला म्हातारा पुटपुटला. ‘‘हा चुकीच्या टोकाकडून त्याला आणतोय. वाऱ्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर समोरच्या बाजूने आणलं पाहिजे. आमचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज नेहमी तिथून गोलंदाजी टाकायचा.’’ या कथा तुम्हाला इंग्लंडमध्ये ऐकायला मिळतात. कारण बदलणाऱ्या वातावरणातून तो अनुभव मिळालेला असतो. हिंदुस्थानी संघ फक्त 16 धावांनी हरला तेव्हा तो गोरा म्हातारा हळहळला. इंग्लंडमध्ये खेळताना म्हणून क्रिकेटचा इतिहास ज्ञात असावा लागतो. तो माहीत असणं खूप फायद्याचं ठरतं.

इंग्लिश कंडिशन्सची आता पूर्वीची भीती इंग्लंडबाहेरच्या खेळाडूंना फारशी राहिलेली नाही. हिंदुस्थानींच्या बाबतीत ती अत्यंत कमी झालीय. कारण हिंदुस्थानी संघ आता इंग्लंडमध्ये पूर्वीपेक्षा वारंवार जातो. कधी टी-20, कधी चॅम्पियन्स ट्रॉफी, कधी सीरिज यामुळे पूर्वीप्रमाणे हिंदुस्थानी टीम इंग्लंडला सणासुदीला जात नाही. या वर्ल्ड कपचा विचार केला तर खेळपट्टय़ा अगदी ठणठणीत दिसतायत, फलंदाज आनंदोत्सव करतायत. त्यामुळे एका महाभूताला त्यांनी दंगा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केलाय, पण आकाश कुणाच्याही हातात नाही. त्याचे दोरे फक्त परमेश्वराच्या हातात आहेत. त्यामुळे वातावरण ढगाळ झालं की, चेंडू स्विंग होणार. चेंडू स्विंग व्हायला लागला की, अजूनही बऱ्याचदा हिंदुस्थानी फलंदाजांचं ‘ग्यानबा तुकाराम’ सुरू होतं. तुमच्याकडे स्विंग खेळायचं तंत्र असेल तरच विठ्ठल मदतीला येतो, एरवी नाही आणि आता वन डेमध्ये दोन चेंडू वापरले जातात. त्यामुळे चेंडू जुना होत नाही. इंग्लंडमध्ये आऊटफिल्ड चांगले असल्याने चेंडूची लकाकी जास्त वेळ राहते. त्यामुळे पारंपरिक स्विंग गोलंदाजाला करता येते, पण आकाश हे महाभूत आपली फलंदाजी झाल्यावर नाचायला लागले तर आपल्याला प्रचंड फायदा आहे. कारण आपली गोलंदाजी सर्वोत्तम आहे. बुमराह, शमी, भुवनेश्वर वगैरे गेल्याच जन्मी स्विंग शिकून आल्याप्रमाणे चेंडू स्विंग करतात. त्याबरोबर वेग आहे, बाऊन्स आहे. त्यामुळे समोरच्या कुठल्याही फलंदाजांनाही ते अग्नीतून चालत जाणे असू शकते, पण त्यांनाही मागे टेकायला धावांचा लोड लागेल. अशा वातावरणात हिंदुस्थानी फलंदाज हे लाड पुरवतील का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 1983 साली इंग्लंडमध्ये हिंदुस्थानी संघ का जिंकला? कारण आपल्याकडे इंग्लिश वातावरणासाठी योग्य गोलंदाज होते. भले कपिल सोडला तर त्यातला एकही जागतिक दर्जाचा नसेल. इंग्लिश काऊंटीत तसे खंडीभर सापडतील, पण त्यांनी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज हे महत्त्वाचे सामने जिंकून दिले होते. त्यामुळे अकस्मात धाड टाकणाऱ्या या पंचमहाभूतांवर जो मात करील किंवा स्वतःच्या वाटेला न येता पंचमहाभूतं दुसऱ्याच्या वाटेला जायचं नशीब असेल, त्या संघाला यश मिळेल. आहे कुणी मांत्रिक ही ‘भुतं’ उतरवणारा? नाहीतरी हल्ली मांत्रिकांचाच जमाना आहे.