
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या हिंदुस्थान अफगाणिस्तान सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा याने शतक ठोकत अनेक विक्रम मोडले आहेत. रोहीतने अवघ्या 63 चेंडूत हे शतक ठोकले आहे. त्याचे हे शतक सर्वात जलद शतक ठरले असून त्याने कपिल देव यांचा 40 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे. कपिल देव यांनी 1983 च्या वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वे विरोधात 72 चेंडूत शतक झळकावले होते.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड रोहीत शर्माने मोडला आहे. आतापर्यंत हा सचिन तेंडुलकर हा सहा शतक करून पहिल्या स्थानावर होता. रोहीत शर्माने आजचे वर्ल्डकपमधले त्याचे सातवे शतक करून सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
सिक्सर किंग बनला रोहीत शर्मा
रोहीत शर्माने आतापर्यंतच्या खेळात 4 षटकार मारले आहेत. त्यात तिसरा षटकार मारताच खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 555 षटकार ठोकले आहेत. यासह त्याने स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याचा रेकॉर्ड तोडला आहे. आतापर्यंत सर्वाधिक सिक्सरचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने तिन्ही फॉरमॅटमध्ये 553 षटकार मारले आहेत.
सचिनचा आणखी एक रेकॉर्ड मोडला
रोहीत शर्माने सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. रोहीत हा वर्ल्डकपमध्ये कमी डावात 1000 धावा करणारा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. रोहीतने 19 डावात 1000 धावा केल्या आहेत. तर सचिनने वर्ल्डकपमध्ये 20 डावात 1000 धावा केल्या आहेत.


























































