
सामना ऑनलाईन, सोची
फिफा फुटबॉल विश्वचषकातील चौथ्या व शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये क्रोएशियाने पेनल्टी शूट आउट मध्ये यजमान रशियाला ४-३ अशा फरकाने हरवत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयाबरोबरच क्रोएशिया १९९८ नंतर पहिल्यांदाच उपांत्य फेरित पोहोचली आहे. निर्धारित वेळेपर्यंत हा सामना १ – १ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे या सामन्याला ३० मिनिंटाचा वेळ वाढवून देण्यात आला . वाढवलेल्या वेळेमध्ये दोन्ही संघानी १-१ गोल केला. त्यामुळे सामना २-२ अशा बरोबरीत सुटला. म्हणून पेनल्टी शूट आउट देण्यात आला. पेनल्टी शूट आउट मध्ये क्रोएशियाने रशियाचा ४-३ अशा फरकाने धुव्वा उडवला. क्रोएशिया कडून क्रेमेरिचने ३९ व्या आणि डोमागोज विदाने १०१ व्या मिनिटीला गोल केला. तर रशिया कडून डेनिस चेरीशेव ३१व्या आणि मारिया फर्नांडेसने ११५ व्या मिनिटाला गोल केला.
क्रोएशियाने केली अर्जेंटीनाच्या या विक्रमाची बरोबरी
क्रोएशिया एकाच विश्वचषकात मध्ये दोन वेळा पेनल्टी शूट आउट मध्ये जिंकणारा दुसरा संघ बनला. यापूर्वी अर्जेटीनाने १९९० मध्ये पेनल्टी शूट आउट मध्ये यूगोस्लाविया आणि इटलीला हरवले होते. क्रोएशियाचा गोलकीपर सुबाचिक दोन्ही सामन्यामध्ये पेनल्टी शूट आउट मध्ये ४ गोल आडवणारा तिसरा गोलकिपर बनला. या पूर्वी अर्जेंटीनाचा सर्जियो गोयकोचेया व पश्चिम जर्मनीच्या हेराल्ड शूमाकरने ४ गोल आडविले होते.



























































