जसवली गावात रुग्णालय परिसरात घुसली मगर, वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने केले जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

जिल्ह्यात काही तालुक्यात पाणी टंचाई समस्या असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहेत. मात्र या पाणी टंचाईचा सामना चक्क मगरीला सहन करावा लागला असल्याची घटना श्रीवर्धन तालुक्यातील जसवली येथे घडली आहे. उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहेत तसा तो प्राण्यांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे पाण्याच्या वा खाण्याच्या शोधात निघालेली मगर ही लोकवस्तीत आल्याने एकच खळबळ उडाली.

श्रीवर्धन तालुक्यात काल 29 मे रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जसवली गावात शासकीय रुग्णालयाजवळ मगर आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र स्थानिक तरुणांनी वन विभागाच्या मदतीने मगरीला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिली आहे. वन विभागाने या मगरीला मगरीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सोडून दिले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील जसवली गावात असलेल्या
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्री पावणे दहाच्या सुमारास मगर आली होती. मगरीला पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिकांनी श्रीवर्धन वन विभागला याबतची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर श्रीवर्धन वन अधिकारी नरेंद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मगरीला मोठ्या शिताफीने जेरबंद केले व तिला मगरीचे वास्तव असलेल्या पाण्यात सोडून दिले. मगरीला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी निश्वास सोडला.

सदर मगर ही 90 ते 100 किलोची असुन साधारण सात फूट लांबीची होती. पाण्याच्या वा खाण्याच्या शोधात ती आली असावी. मगरीला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडून पाण्यात सोडून दिले आहे. असे नरेंद्र पाटील, वन अधिकारी यांनी सांगितले.