
परिसरातील वाहतूककोंडी फुटणार
पालिकेच्या के/पश्चिम विभाग अंधेरीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील मढ-वर्सोवा प्रकल्पासाठी ‘सीआरझेड’ परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हा पूल बांधण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या पुलासह पी/उत्तर मालाडमधील धारिवली गाव येथील मार्वे रोडवरील पूल आणि के/पश्चिम आणि पी/दक्षिण गोरेगावच्या सीमेवर वाहनांसाठी भगतसिंग नगर, गोरेगाव खाडीजवळदेखील ब्रीज बांधण्यात येणार आहे.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. या पुलांसाठी महत्त्वपूर्ण असणारी सीआरझेड परवानगी मिळाल्यामुळे हे पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


























































