
जादा भाडय़ासाठी टॅक्सीवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्रिपेड बुकिंग टॅक्सी स्टॅण्डला सोडल्याचे उघडकीस आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचे फलाट वाढविल्याने प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे टॅक्सीवाल्यांनी आपला मुक्काम 18 नंबर फलाटाकडील (पी. डिमेलो रोड) गेटवर हलविला आहे.
सीएसएमटीतील प्रिपेड टॅक्सी बुकिंग स्टॅण्ड कोरोनानंतर बंद पडल्याचे वृत्त दै.‘सामना’ने दिले होते. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनच्या कमर्शियल विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आणि मुंबई मध्य झोन ताडदेवचे डेप्युटी आरटीओ यांच्यात 9 जानेवारी 2020 रोजी तीन वर्षांसाठी 8 जानेवारी 2023 पर्यंतचा प्रिपेड टॅक्सी बुकिंगसाठी करार झाला होता, परंतु जीपीओच्या गेटजवळील टॅक्सी स्टॅण्डकडे प्रवाशांचा ओघ कमी आहे. तसेच सीएसएमटीच्या फलाटांची लांबी 24 डब्यांसाठी केल्याने प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पी. डिमेलो रोड येथील गेटजवळील टॅक्सी स्टॅण्डला टॅक्सीचालक प्राधान्य देत असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले. प्रिपेड टॅक्सी बुकिंग स्टँडकरिता रेल्वेने जागा भाडय़ाने देण्याचे टेंडर काढून कंत्राट नेमावे लागते. त्यासाठी एमएमआरटीएची मंजुरी घ्यावी लागते. तरच प्रिपेड टॅक्सी बुकिंग स्टॅण्डला मान्यता मिळते अशी माहिती आरटीओच्या सूत्रांनी दिली.

























































