आणखी एक श्रद्धा! दुसऱ्यासोबत लग्न केले म्हणून प्रियकराने प्रेयसीचे केले तुकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेयसीने दुसऱ्या सोबत लग्न केले म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिची हत्या करून तिचे तुकडे विहरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम प्रिन्स यादवला अटक केली आहे. प्रिन्सने त्याचे पालक, चुलत भाऊ व इतर काही नातेवाईकांच्या मदतीने आराधना नावाच्या तरुणीची हत्या केली होती.

प्रिन्स व आराधनाचे अफेयर होते. मात्र आराधनाने घरच्यांच्या मर्जीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केले होते. त्यामुळे प्रिन्स संतापला होता. त्याने आराधनाची हत्या करायचे ठरवले. त्यानुसार तो आराधनाच्या सासऱच्या घराजवळ दबा धरुन होता. ज्यावेळी आराधना काही कामानिमित्त घराबाहेर आली त्याने व त्याच्या नातेवाईकांनी तिचे अपहरण करून तिला उसाच्या शेतात नेले. तिथे तिची हत्या केली व त्यानंतर तिच्या शरीराचे सहा तुकडे केले. त्यांनी सर्व तुकडे एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरले व त्या पिशव्या एका विहरीत टाकल्या. त्यानंतर ते तिचे छाटलेले मुंडके घेऊन जंगलात गेले व ते तिथेच फेकले.

या प्रकरणी पोलिसांनी प्रिन्स यादवला अटक केली, प्रिन्सने आराधनाचे मुंडके कुठे फेकले ते शोधण्यासाठी पोलीस घेऊन जात असताना त्याने गावठी कट्ट्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला थांबवण्यासाठी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आहे.