सेक्सटॉर्शन कॉलद्वारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना सेक्सटॉर्शन कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी प्रल्हाद पटेल यांच्या वतीने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. पटेल यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हिडिओ कॉल आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी हा कॉल उचलताच दुसरीकडून अश्लील व्हिडिओ सुरु झाला. यानंतर पटेल यांनी तात्काळ फोन कट केला.

पटेल यांना हा व्हिडिओ कॉल करून सेक्सटॉर्शनद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. केंद्रीय मंत्र्यांकडून आलेल्या तक्रारीवर कारवाई करत दिल्ली गुन्हे शाखेने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पटेल यांचे स्वीय सचिव आलोक मोहन यांच्या वतीने दिल्ली पोलीस आयुक्तांना ही तक्रार देण्यात आली. पटेल यांच्या मोबाईल क्रमांकावर हा व्हिडिओ कॉल आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे दिले होते. तपास करत असताना गुन्हे शाखेने मोहम्मद वकील आणि मोहम्मद साहिब या दोन आरोपींना राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली आहे. मात्र यातील सूत्रधार साबीर फरार आहे. गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी एका संघटित टोळीशी संबंधित आहेत जे सेक्सटोर्शन कॉल करून ब्लॅकमेल करतात, अशी माहिती समोर आली आहे.