सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी; महिला व बालिकांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संघटित गुन्हेगारी आता इतिहासजमा होत असतानाच सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढू लागली आहे. मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे लॉकडाऊनमध्ये गेली असली तरी सायबर भामटय़ांनी मात्र संधी साधली. सायबर गुन्ह्यांबरोबरच महिला व बालकांवरील अत्याचाराचे गुन्हेदेखील वाढल्याचे चित्र मुंबई पोलिसांनी आज प्रसिद्ध केलेल्या वार्षिक गुन्ह्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

मुंबई पोलिसांनी आज गेल्या तीन वर्षांतील सर्व गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. वर्ष 2019 ते 2021 या तीन वर्षांत घडलेले व दाखल गुन्हे तसेच किती गुन्ह्यांची उकल झाली याची आकडेवारी  दिली आहे. त्यानुसार सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वर्ष 2019 व 20 च्या तुलनेत 2021 मध्ये वाढलेले दिसतात. या गुन्ह्यांची उकल होत असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. महिला व बालिकांवरील अत्याचाराचे गुन्हेदेखील वाढले आहे. पश्चिम उपनगरात महिलांवरील वेगवेगळ्या स्वरूपातील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे घडले असून उत्तर प्रादेशिक विभागात अल्पवयीन मुलींवर विनयभंग, बलात्कार, छेडछाड व पोक्सोचे गुन्हे दाखल झाले आहेत. वर्ष 2021 मध्ये महिलांवरील अत्याचाराचे 5496 गुन्हे दाखल असून त्यातील 4335 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. तर बालिकांवरील अत्याचाराचे एक हजार 51 गुन्हे दाखल असून 959 गुन्ह्यांची उकल करण्यात आली.

सायबर गुन्हे वाढत असताना ते उघड होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही हे खरे आहे. हे गुन्हे परराज्यातून किंवा परदेशातून केले जातात. त्यामुळे बऱ्याचदा ते गुन्हे उघडकीस आणण्यास अडचणी येतात. महत्त्वाचे व गंभीर गुन्हे गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी वेळीच उघडकीस आणलेत. पण त्याचवेळी पोलीस ठाण्यात दाखल होणारे सायबर गुन्हे म्हणावे तसे उघडकीस येत नसल्याचे चित्र असल्याने लवकरच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱयांना उच्चप्रतीचे प्रशिक्षण देणार असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

तीन वर्षांतील गुह्यांचा लेखाजोखा

वर्ष 2021 मध्ये एकूण 2883 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक गुन्हे हे क्रेडिट कार्ड फ्रॉड, ऑनलाइन फ्रॉडचे असून सर्वात कमी गुन्हे अॅडमिशन फ्रॉडचे नोंद आहेत.

सायबर गुन्हे

वर्ष               दाखल          उघड        दोषसिद्धीचे प्रमाण

  • 2019           2518           348               14
  • 2020           2435           207                 9
  • 2021           2883          455                 16

तो एक तास महत्त्वाचा

सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या काढून ऑनलाइन फसविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या बँक खात्यातील पैसे वळते झालेत हे लक्षात आले की लगेच पोलिसांशी संपर्क साधा. तो एक तास खूप महत्त्वाचा असतो. त्या वेळेत पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यास पैसे जाण्यापासून रोखता येतात. त्यामुळे नागरिकांनी भामटय़ांच्या भूलथापांना बळी न पडता बँक डिटेल देऊ नये आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त नगराळे यांनी केले आहे.

लियो श्वान बेस्ट ठरला

गुन्हे शाखेच्या श्वानपथकातील डॉबरमॅन जातीचा लियो हा श्वान 2021 मध्ये बेस्ट श्वान ठरला. लियोने महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

2021 मध्ये पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांवर झालेली कारवाई

  • निलंबित केलेले अधिकारी, कर्मचारी  81
  • व्यक्तिनिहाय प्रशासकीय शिक्षा 2437
  • सेवेतून बडतर्फ    32
  • सेवेतून कमी        33
  • सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त       01

2021 मध्ये गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने तब्बल 91 कोटी 90 लाख 44 हजार 875 रुपये किमतीचा ड्रग्ज साठा जप्त केला. तर गुन्हे शाखेच्या पथकांनी 24 कोटी 94 लाख 28 हजार किमतीचा ड्रग्ज पकडला असून पोलीस ठाणे पातळीवर 34 कोटी 63 लाख 94 हजार 566 रुपये किमतीचा ड्रग्ज साठा पकडला.

शहरातील 3282 वाहने चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 1599 गुन्हे उघडकीस आले आहेत. याशिवाय चोरीचे साडेचार हजार गुन्हे दाखल होऊन त्यापैकी 1870 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

वर्षभरात 64 हजार गुन्ह्यांची नोंद

वर्षभरात शहरातील 94 पोलीस ठाण्यांमध्ये 64,656 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 53,193 गुह्यांची उकल करण्यात आली आहे. कोरोना काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांबाबत अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुंबई पोलीस विभागाने भादंवि कलम 188 अन्वये दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे वर्ष 2021 मध्ये दाखल गुह्यांचा आकडा मोठा दिसत असल्याचे सांगण्यात आले. या वर्षी परिमंडळ-11 मध्ये सर्वाधिक 8138 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

  • 2021 मध्ये चोरीला गेलेली मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण वर्ष 2019 व 20 च्या तुलनेत सर्वाधिक.
  • महिलांवरील अत्याचारासंबंधी  दाखल गुह्यांत वर्ष 2020 च्या तुलनेत 21 टक्क्यांनी वाढ.
  • या वर्षी एकूण चार हजार 329 अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.
  • युसूफ बचकाना, एजाज युसूफ लकडावाला, पांडवपुत्र, रवी पुजारी या गँगस्टर्सवर कारवाई करण्यात आली.
  • वर्ष 2021 मध्ये एकूण 109 शस्त्रास्त्रे आणि 331 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. तर ही शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या 125 जणांवर कारवाई करण्यात आली.