कोरोनानंतर सिरमकडून डेंग्यू, मलेरियावर लस; सायरस पूनावाला यांची माहिती

कोरोनावर प्रभावी अशा कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती केल्यानंतर सिरम इन्स्टिटय़ूटतर्फे आता मलेरिया आणि डेंग्यू आजारांवर लस तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सिरम इन्स्टिटय़ूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी दिली.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पूनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही आतापर्यंत खूप लसी बनवल्या आहेत. सध्या देशासह जगभरात डेंग्यू, मलेरिया आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सिरमकडून आता डेंग्यू, मलेरियावर लस तयार करण्यात येणार आहे.

शरद पवार यांनी आता आराम करावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी होती; मात्र त्यांनी ती घालवली. ते जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करू शकले असते. माझे जसे वय झाले तसेच आता त्यांचेही वय झाले आहे. त्यांनी आराम केला पाहिजे, असा सल्ला पूनावाला यांनी दिला.