सहा महिन्यांपूर्वी बांधलेली दाभोळे-पितळेवाडी प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे-पितळेवाडी येथील आदर्श प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळण्याचा प्रकार घडला आहे. सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेली ही भिंत तीन वेळा कोसळल्याने या भिंतीच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील पितळे आणि सदस्य यांनी केली आहे.

या शाळेची संरक्षण भिंत 6 महिन्यांपूर्वीच बांधण्यात आली होती. या कालावधीत ही भिंत तीन वेळा पडल्याचा आरोप सुनील पितळे यांनी केला आहे, दरम्यान आता ही भिंत कोसळल्याने शाळेचा परिसर मोकळा होऊन पटांगणातील आणि संरक्षण भिंतीखालील माती रस्त्यावर आली आहे. सहा महिन्यांत तीन वेळा पडणाऱ्या या भिंतीचे बांधकाम कसे करण्यात आले आहे, याची चौकशी करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती आणि सदस्यांकडून करण्यात आली असून याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष सुनील पितळे यांनी सांगितले.