पुढचे चार दिवस पश्चिम रेल्वेच्या 175 लोकल रद्द
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी सोमवार 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन लोकल आणि अप आणि डाऊन या चारही मार्गांवर ताशी 30 किमी वेगाचे निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. परिणामी, पुढच्या चार दिवसांत अंदाजे 150 ते 175 लोकल रद्द केल्या जातील. 4 ऑक्टोबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अनियमित वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे.
लोक न्यायालयात प्रलंबित 12,756 खटल्यांचा निपटारा
शहर व उपनगरांतील विविध न्यायालयांत आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रलंबित 12,756 खटल्यांचा निपटारा करण्यात आला. तब्बल 1494 कोटी प्रकरणे निकाली काढण्यात आली. फोर्ट येथील नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, राज्य ग्राहक आयोग, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी, मॅक्ट मुंबई येथे लोक अदालत आयोजित केली होती. या वेळी 92 पॅनेल कार्यरत होती. त्यांनी 12,756 प्रलंबित, तर 3305 प्रकरणे निकाली काढली. या प्रकरणांचे मूल्य 1494 कोटी रुपये आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात 4976 खटले निकाली काढण्यात आले. प्रधान सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी वृक्षाला जल अर्पण करून लोक अदालतची सुरुवात केली. अशी माहिती मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव (न्यायाधीश) अनंत देशमुख यांनी दिली.
वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
भरधाव वेगातील वाहनाने महिलेला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. अपघातानंतर चालकाने पळ काढला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. नरेंद्र वाघ हे माटुंगा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गेल्या बुधवारी ते गस्त करत होते. गस्तीदरम्यान रात्री एकाने त्यांना हालिया मदरशासमोर अपघात झाल्याचे सांगितले. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. घटनास्थळी पोलिसांना एक महिला गंभीर जखमी अवस्थेत दिसली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस त्या चालकाचा शोध घेत आहेत.