Dantewada attack चालकाची गुटख्याची तलफ जवानांच्या पथ्यावर, नक्षलवादी हल्ल्यातून वाचला जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा येथे बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या भयंकर आयईडी स्फोटात डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे 10 जवान शहीद झाले. जवानांसह एका वाहन चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना या हल्ल्यातून बचावलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातून आपण कसे बचावले याबाबत वाहन चालकाने माहिती दिली आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर 20 वर्षीय वाहन चालकाने सांगितले की, ‘मी चालवत असलेल्या गाडीमध्ये सात जवान होते. गाडी चालवताना गुटखा खाण्याची तलफ झाल्यामुळे गाडीचा वेग थोडा कमी केला आणि या दरम्यान आमच्या मागे असणाऱ्या गाड्या ओव्हरटेक करून पुढे निघून गेल्या. त्यानंतर काही वेळातच मोठा स्फोट झाला आणि गाड्याच्या चिंधड्या उडाल्या. आम्ही थांबलेल्या गाडीपासून 200 मीटर अंतरावरच हा स्फोट झाला. त्यांच्या (नक्षलवादी) निशाण्यावर आमचीच गाडी होती, परंतु देवाने आम्हाला वाचवले.’

नक्षलवादी हल्ला झाल्याचे दिसताच गाडीतील जवानांनी बाहेर उड्या घेतल्या आणि रस्त्याशेजारी पोजीशन घेत जंगलाच्या दिशेने नक्षलवाद्यांवर गोळीबार सुरू केला. जवळपास 15 मिनिटं गोळीबार सुरू होता, असेही तो पुढे म्हणाला. तसेच माझ्या डोळ्यादेखत आयईडी स्फोट झाला आणि गाडीच्या चिंधड्या उडाल्या. मी लपतछपत रांगत गाडीच्या खाली जाऊन लपून बसलो. त्यानंतर जवानांनी मला अरनपूरला जाण्यास सांगितले आणि मी हल्ल्यापासून एक किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस स्थानकामध्ये आलो. माघारी परतताना आपण पोलिसांना या हल्ल्याची माहिती दिली, असेही वाहनचालकाने सांगितले.

दोन नक्षलवादी ताब्यात

दरम्यान, बुधवारी अरनपूरपासून सात किलोमीटर अंतावर असणाऱ्या नहाडी गावाजवळ सुरक्षङा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान दोन नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नक्षलवाद सोडून मुख्य प्रवाहात आले, दंतेवाडात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले

कधी झाला हल्ला?

पेंद्रीय राखीव पोलीस दलाने नक्षलग्रस्त भागातील हिंसक कारवाया रोखण्यासाठी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड अर्थात ‘डीआरजी’ची स्थापना केली आहे. नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या स्थानिक तरुणांचा या ‘डीआरजी’ पथकात समावेश आहे. दरभा येथील पुरा हिंदमा विभागात नक्षलवादी लपल्याची माहिती ‘डीआरजी’ पथकाला मिळाली. तेथील ऑपरेशन पूर्ण करून डीआरजी जवानांचे पथक दंतेवाडा येथे परतत असताना नक्षलवाद्यांनी अरणपूर-सामेजी रस्त्यावर आयईडी स्फोटके पेरली होती. या वेळी जवानांना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन स्फोटनी उडवली. हा स्फोट एवढा भीषण होता की, दहा जवान आणि वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला.