अनाथाचे नाथ बनले दराखे कुटूंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

तालुक्यातील साखळी या गावचे विक्रम भागाजी दराखे व त्यांचे चिरंजीव अजय दराखे या संपूर्ण कुटूंबाने अनाथ मुलांचे पालन पोषण व शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले आहे. नंदनवन परिवार या नावाखाली साखळी येथे सुरु असलेल्या अनाथाश्रमात आज अठरा मुले निवासी असून त्यांच्या पालन पोषणासोबत त्यांना शिक्षण देण्यात येत आहे.

साखळी येथील विक्रम भागाजी दराखे हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी यांनी समाजसेवक बाबा आमटे व स्नेहालयाचे गिरीषकाका कुळकर्णी यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा घेतली आहे. नोकरीत असताना ते मुलं शिक्षणासाठी दत्तक घेत तर त्यांची पत्नी संजना विक्रम दराखे या गोरगरीब घराच्या मुलींना मोफत शिलाई मशिनवर कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी दोन हजार मुलींना मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण दिले व त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. परंतु अनाथ मुलांचे शिक्षणासाठी व त्यांच्या निवासासाठी काहीतरी करावे ही भावना विक्रम दराखे व त्याचे चिरंजीव अजय दराखे यांच्या मनात आली व त्यांनी २०१४ यावर्षी छत्रछाया ह्युमन डेव्हलपमेंट फाऊंडेशन बुलढाणा स्थापन करुन त्या अंतर्गत नंदनवन परिवार स्थापन केला. अनाथ मुले, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे मुले, आई-वडिल आहे परंतु पालन पोषण करु शकत नाही. अशा परिवारातील मुलांसाठी शिक्षण व पालन पोषणाची जबाबदारी नंदनवन परिवार करेल असे ठरविले.

दराखे कुटूंब आपला संपूर्ण वेळ, श्रम या नंदनवन परिवारासाठी देत आहे. संपूर्णपणे या कार्यासाठी या कुटूंबाने वाहून घेतले आहे. येथे ६० अनाथ मुले राहु शकतील एवढे बांधकाम सुरु आहे. काम अर्ध्यावर असून खर्‍या अर्थाने समाजातील अनेक श्रीमंत दानशूर लोकांनी या नंदनवन आश्रमास सढळ हाताने मदत करण्याची आवश्यकता आहे. दिवाळीत फटाके व इतर गोष्टीवर वायफळ खर्च करणार्‍यांनी अनाथ मुलांच्या मदतीसाठी पुढे यावे. सर्वांनी मदत करण्याची आवश्यक असून कोणाला मदत करायची असेल त्यांनी अजय दराखे यांचा भ्रमणध्वनी क्र.९८५०५२७१८५ यावर संपर्क साधावा असे आवाहन नेहमीच ते करत आले आहे. तेव्हा समाजातील दानशूर व्यक्तींनी दिवाळीत एक दिवा मदतीचा अनाथाच्या घरी मदत करुन लावावा अनाथांच्या जीवनातील अंध:कार दूर करावा हीच दिपावलीची अपेक्षा.