
राज्यातील निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाने सर्वेक्षणासाठी 28 ऑक्टोबर ही सुधारित कालमर्यादा जाहीर केली आहे. त्यासाठी ‘उल्लास’ या अॅपवर असाक्षर आणि स्वयंसेवकांची ऑनलाइन जोडणी (टॅगिंग) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणात सापडलेल्या निरक्षर व्यक्तींची फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱया आठवडय़ात नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) मार्फत एफएलएन ही चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.
अभियानाच्या कोणत्याही टप्प्यावरील शिक्षकांनी कामात टाळाटाळ केली तर त्यांच्यावर शाळा संहिता तसेच अन्य नियमानुसार कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षक आणि संबंधितांची आहे. त्यातून राज्याला साक्षर करण्यासाठी मोठा लाभ होणार असल्याने यात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
ऑफलाइन सर्वेक्षणाची आवश्यकता का?
2011 च्या जनगणनेनुसार राज्यात सर्व वयोगटातील 1 कोटी 78 लाख व्यक्ती निरक्षर आहेत, तर 15 व त्याहून अधिक वयोगटातील 1 कोटी 63 लाख व्यक्ती असाक्षर आहेत. केंद्र सरकारने राज्याला जिल्हानिहाय, प्रवर्गनिहाय, लिंगनिहाय उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. योजना संचालनालयाने केंद्र व राज्य जनगणना कार्यालयास निरक्षरांची यादी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती. जनगणना अधिनियम 1948 नुसार केवळ सांख्यिकीय माहिती प्रकाशित होते. कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक माहिती प्रसिद्ध होत नाही.

























































