दत्ता इस्वलकर – झुंजार नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड

राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते असलेल्या दत्ता इस्वलकर यांनी 2 ऑक्टोबर 1989 रोजी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली होती. ते अखेरपर्यंत समितीचे अध्यक्ष राहिले होते. 1988-90 च्या दशकात बंद पडलेल्या दहा गिरण्या त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी कामगारांना स्वेच्छानिवृत्तीचे चांगले पैसे मिळून दिले. गिरण्यांच्या जमीनीवर कामगारांना घरे आणि रोजगार मिळाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. त्यासाठीच त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी 1999 पासून आजपर्यंत संघर्ष केला. गिरण्यांच्या जागेवर आजपर्यंत 15 हजार कामगारांना घरे मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच गिरण्यांच्या चाळीतील 7 ते 8 हजार रहिवाशांना त्यांनी घरे मिळवून दिली. त्यांच्या जाण्याने गिरणी कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यासाठी संघर्ष करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

अनेक मोर्चांचे नेतृत्व

गिरणी कामगारांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी काँग्रेस सरकारने मार्च 2001 मध्ये जीआर काढला. यानुसार मिलच्या जागेवर जो रोजगार उभा राहिल तेथे कामगारांच्या एका मुलाला नोकरी देण्याचा निर्णय झाला. मात्र, अद्याप त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दत्ता इस्वलकरांनी एका मोर्चाचे आयोजन केले होते. यासाठी इस्वलकरांच्या मार्गदर्शनाखाली भायखळ्यात गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्थेचे काम सुरु आहे. याच संस्थेच्या माध्यमातून हा लढा उभा करण्यात आला होता. मॉर्डन मिलमध्ये कारकुनाची नोकरी करून कौटुंबिक हालअपेष्टा सहन करीत त्यांनी दत्ता सामंतांच्या नंतर गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला.

धडाडणारी तोफ थंडाकली

ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने जीवनभर संघर्ष करणारे ध्येयवादी नेतृत्व हरपले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितपवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. कामगार चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली असून, कामगारांच्या प्रश्नांवर कायम धडाडणारी तोफ थंडावली, अशा शब्दांत भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर यांनी शोक व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या