दत्तात्रय वळसे-पाटील सुपर स्पेशालिटी आय केअरचे रविवारी उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन,  पुणे

व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन आणि पुणे पालिकेच्या वतीने बोपोडीत उभारण्यात आलेल्या दत्तात्रय वळसे-पाटील सुपर स्पेशालिटी आय केअर(नेत्र विकार) रूग्णालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 11) रोजी  दुपारी चार वाजता होणार आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या रुग्णालयासाठी ३४ कोटी रुपये खर्च आला असून या रूग्णालयात मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना उपचार, लेसिक लेजर, फेमटो  कॅटारॅक्ट आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

हे रुग्णालय सुमारे १०,००० चौ.फूट जागेत बांधण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी पुणे महापालिका आणि व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन यांच्यामध्ये ३० वर्षासाठी करारनामा झाला आहे. पालिकेच्या वतीने डोळयांचे विविध विकार व आजारांवर अत्यंत स्वस्त दरात रूग्णांना सोयीसुविधा व उपचार उपलब्ध करून देणारे हे देशातील पहिले सुपर स्पेशालिटी आयकेअर रूग्णालय आहे. राज्यातील शासकीय रूग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये उपलब्ध नसलेल्या शस्त्रक्रिया या सुपर रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या रुग्णालयामध्ये सी.जी.एच.एस. पेक्षा कमी दरात शस्त्रक्रिया, उपचार करण्यात येणार आहेत. हे रुग्णालय सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कारणासाठी खुले राहणार असून यामध्ये सुमारे १८ तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांच्या सेवेसाठी हजर असणार आहेत.

बोपोडी येथील पुणे आय.टी पार्क जवळ रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, डॉ.अंबरीश दरक, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, पालिकेच्या मेडिकल युनिटचे सहाय्यक आरोग्याधिकारी डॉ. संजीव वावरे, डॉ. सुरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन सभारंभाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.