हिंदुस्थानपुढे पाकिस्तान चारीमुंड्या चीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने पाकिस्तानला 4-0 फरकाने चारीमुंड्या चीत करून डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत निर्भेळ यश संपादन केले. उभय संघांनी पाचवा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. सदाबहार टेनिसपटू लिएंडर पेसने जीवन नेदुंचेझियान याच्या साथीने दुहेरीत कारकीर्दीतील विक्रमी 44 वा विजय संपादन केला. याचबरोबर हिंदुस्थानने पाकिस्तानला नमवित 2020 मध्ये होणाऱया पात्रता फेरीचे तिकीटही बुक केले. डेव्हिस चषक स्पर्धेत हिंदुस्थानने सलग सातव्यांदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला हे विशेष.

शुक्रवारी 2-0 अशी आघाडी घेऊन स्पर्धेची झकास सुरुवात करणाऱया हिंदुस्थानने शनिवारीही पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. लिएंडर पेस-जीवन नेदुंचेझियान या हिंदुस्थानी जोडीने मोहम्मद शोएब व हुफैजा अब्दुल रहमान या पाकिस्तानची जोडीचा 53 मिनिटांपर्यंत चाललेल्या लढतीत 6-1, 6-3 असा पराभव करून हिंदुस्थानला 3-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतर परतीच्या एकेरी लढतीत हिंदुस्थानच्या सुमित नागलने पाकिस्तानच्या युसूफ खलीलचा एकतर्फी लढतीत 6-1, 6-0 असा पाडाव करून हिंदुस्थानला 4-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतर उभय संघांनी फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेला पाचवा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.

आता क्रोएशियाचे आव्हान

2020 मध्ये पात्रता फेरीत हिंदुस्थानपुढे क्रोएशियाचे आव्हान असेल. ही स्पर्धा येत्या 6-7 मार्चला होईल. डेव्हिस कप फायनलमध्ये 12 पात्रता स्थानांसाठी 24 संघ एकमेकांना भिडतील. यातील पराभूत होणारे संघ सप्टेंबर 202‘0 ला वर्ल्ड ग्रुप वन स्पर्धा खेळतील, तर विजेते संघ फायनलमध्ये खेळतील. फायनलसाठी कॅनडा, ब्रिटन, रशिया, स्पेन, फ्रान्स व सर्बिया हे संघ आधीच पात्र ठरले आहेत