‘डेक्कन क्वीन’चा उद्या 89 वा वाढदिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ब्रिटिशांनी हिंदुस्थानात रेल्वे सुरू केल्यानंतर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने पहिली  लक्झरीयस सेवा म्हणून 1 जून 1930 रोजी मुंबई-पुणे मार्गावर ‘डेक्कन क्वीन’ एक्सप्रेस सुरू केली त्यास 89 वर्षे पूर्ण होत आहेत. या गाडीला धावते उपहारगृह म्हणजे अनोखी ‘डायनिंग कार’ असल्याने महाराजा एक्स्प्रेस, डेक्कन ओडिसी, पॅलेस ऑन व्हिल्ससारख्या महागड्या गाड्या वगळता अशी डायनिंग कार असलेली ही एकमेव गाडी आहे. या गाडीचा प्रवास वेगवान करण्यासाठी तिला डबल इंजिन लावण्याचा विचार आहे. परंतु तिच्या डायनिंग कारमुळे अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे एलएचबी बनावटीची डायनिंग कार तयार करावी लागणार आहे.

मुंबई-पुणे धावणार्‍या ऐतिहासिक ‘डेक्कन क्वीन’चा 1 जून रोजी 89वा वाढदिवस साजरा होत आहे. या गाडीला लवकरच एलएचबी डबे लावण्यात येऊन ‘पुशपूल’ तंत्राने डबल इंजिन लावून तिचाही वेग वाढविण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. सध्या या गाडीला आयसीएफचे पारंपरिक डबे असून तिला असलेल्या अनोख्या ‘डायनिंग कार’ (धावते उपाहारगृह) एलएचबी तंत्राची डायनिंग कार तयार करावी लागणार आहे.

निळा आणि पांढरा रंग कायम

मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्‍यांच्या मनात रुतलेले पारंपरिक पांढरा आणि निळा रंग व लाल पट्टी असे रूप कायम ठेवून तिला अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोड देण्यात येणार आहे. तिची खासियत असलेली ‘डायनिंग कार’ आता एलएचबीची असावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे. जर्मनी तंत्रज्ञानाच्या ‘लिंके हॉफमन बुश’ अर्थात ‘एलएचबी’ डब्यांची डायनिंग कार खास तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.  तसेच या गाडीला एक्झुकेटीव्ह क्लाससाठी विमान प्रवासाप्रमाणे आसने असणारा ‘अनुभूती’ कोचही जोडण्याचा विचार आहे. शिवाय ही गाडी आता 17 डब्यांऐवजी 24 डब्यांची करण्यात येणार आहे.