
हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटचा हिच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील 50 किलो वजनी गटातील अपात्रतेबाबतचा निकाल आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने (सीएएस) मंगळवार, 13 ऑगस्टपर्यंत राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सायंकाळी 6 पर्यंत याप्रकरणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
विनेश फोगाटचे अंतिम कुस्तीपूर्वी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयाविरोधात विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारने विनेशची बाजू मांडण्यासाठी अॅड. हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘सीएएस’ने विनेशला विचारले तीन प्रश्न
विनेश फोगाटच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, परंतु ‘सीएएस’ने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. सीएएसने विनेशला ई-मेलद्वारे तीन प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यातील पहिला प्रश्न, तुला दुसऱ्या दिवशीही वजन करावे लागेल या नियमाची कल्पना होती का? दुसरा प्रश्न हा रौप्यपदकाशी संबंधित आहे. क्यूबन कुस्तीपटू तुमच्यासोबत रौप्यपदक शेअर करेल का? आणि तुम्हाला या याचिकेवरील निर्णय सार्वजनिकपणे जाहीर करायचा आहे की गोपनीय पद्धतीने तो जाहीर करायचा आहे? असे प्रश्न विनेशला विचारण्यात आल्याली माहिती समोर येत आहे.
विनेशला क्रीडा जगतातून पाठिंबा
अवघ्या क्रीडा जगतातून अनेक खेळाडूंनी विनेश फोगाटला पाठिंबा दर्शविला असून तिला रौप्यपदक मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यात अमेरिकेचा सहावेळा जगज्जेतेपद पटकावणारा कुस्तीपटू जॉर्डन बुरोज यांचाही समावेश आहे. त्याने विनेशला पाठिंबा देत तिला रौप्यपदक देण्याची मागणी केली होती. जपानचा सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू रेई हिंगुची यानेही विनेशचे दुःख समजू शकतो, असे म्हटले आहे. हिंदुस्थानतून रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, हॉकीपटू पी. आर. श्रीजेश, बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही विनेशला पाठिबा दर्शविला.


























































