राज्यपालांच्या मदतीने दीपाली सय्यद यांनी गैरव्यवहार केले, माजी स्वीय सहायकाचा गंभीर आरोप

दीपाली सय्यद यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मदतीने मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप सय्यद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, दीपाली सय्यद यांचे दाऊद इब्राहिमसोबत संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी व कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे 28 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या ट्रस्टने सांगली येथे 40 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा व राजभवनात ‘कोविड योद्धा’ पुरस्कार सोहळा घेतला होता. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाला आहे. दीपाली सय्यद यांना भगतसिंह कोश्यारी यांचे पाठबळ आहे. सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व त्यांच्या साथीदारांशी संबंध आहेत. अंडरवर्ल्डमधील काही गुन्हेगारांशी सय्यद यांचा दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष संपर्क होत असायचा. असे असतानाही राज्यपाल कोश्यारी यांनी सय्यद यांना राज्यभवनात प्रवेश दिला. तसेच सय्यद यांच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काही राजकीय नेत्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करण्यास कोश्यारी यांनी सांगितल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.

त्यामुळे दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई व्हावी व भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून दूर करावे, या मागणीसाठी जंतरमंतर येथे 28 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.