धोकादायक प्रोडूनोव्हात आशियाडनंतर पदार्पण – दीपा कर्माकर

48

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

‘व्हॉल्ट ऑफ डेथ ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रोडूनोव्हानेच मला गंभीर दुखापतींच्या खाईत लोटले होते.पण मी तो प्रकार पुन्हा खेळणार आहे. मृत्यूच्या भयाने मागे हटणाऱ्यांपैकी मी नाही. तुर्कीतील सोनेरी यशाने मला पुनरागमनातच मोठा विश्वास लाभलाय. आता आशियाई स्पर्धा संपली कि पुन्हा प्रोडूनोव्हाच्या सरावाकडे वळणार आहे ,अशी प्रतिक्रिया वर्ल्ड चॅलेंज कप जिम्नॅस्टिक स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी हिंदुस्थानी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने मायदेशी परतल्यावर व्यक्त केली.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावून ईतिहास रचणारी दीपा मायदेशी परतल्यावर अतिशय प्रसन्न मूडमध्ये होती. ती म्हणाली , रिओतील यश माझ्यासाठी प्रेरणीय ठरले .पण त्यानंतर प्रोडूनोव्हात झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला आशियाई अजिंक्यपद आणि कॅनडातील जागतिक अजिंक्यपद आणि ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले. दुखापतीतून सावरल्यावर मला पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आलेय याचा मोठा आनंद आहे. या यशाच्या प्रेरणेनेच मी आता प्रोडूनोव्हा या धोकादायक प्रकाराचाही सराव सुरु करणार आहे. तुर्कीतील वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेत दीपाने हॅन्डस्प्रिन्ग ३६० आणि सुकुहरा ७२० या व्हॉल्ट प्रकारांत नेत्रदीपक कामगिरी साकारत सुवर्णपदक पटकावले. जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली हिंदुस्थानी महिला जिम्नॅस्ट ठरली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या