सापडलेल्या मोबाईलमधील सोशल मीडिया ऍपमधून युवतीची बदनामी, कराडमधील युवकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सापडलेल्या मोबाईलमधील सोशल मीडियाच्या ऍपचा गैरवापर करत युवतीची बदनामी केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या सायबर सेलने शहापूर (ता. कराड) येथील अमोल संपत बाबर (वय 26) याला अटक केली. न्यायालयाने त्यास 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शहापूर येथील अमोल बाबर याला एक मोबाईल सापडला होता. या मोबाईलमध्ये काही फोटो, तसेच व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर सोशल मीडियाचे ऍप कार्यरत होते. बाबरने त्या ऍपचा वापर करत सापडलेल्या मोबाईल असणाऱयाशी निगडित एका युवतीचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट सुरू केले. या अकाउंटच्या माध्यमातून अमोलने अश्लील मेसेज व व्हिडीओ प्रसारित करणे सुरू केले. याचदरम्यान मोबाईल हरवलेल्या कुटुंबातील एकाने कराड तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात मोबाईल हरविल्याची तक्रार नेंदवली होती. याच काळात हरविलेल्या मोबाईल व त्यातील ऍपचा गैरवापर सुरू असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

त्यानंतर त्याचा तपास पोलिसांच्या सायबर सेलने हाती घेतला. सायबर सेलचे निरीक्षक अरुण देवकर, सहायक फौजदार महेश शेटे, शंकर सावंत, सचिन पवार, अमित झेंडे, संदीप पाटील, महिला कर्मचारी काकडे यांनी शहापूर येथून अमोल बाबरला ताब्यात घेतले. चौकशीत गुह्याची कबुली दिल्यानंतर त्याला सातारा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कारवाईत सहभागी झालेल्यांचे जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे यांनी अभिनंदन केले आहे.