दिल्लीचा जायंट विजय, कुलदीपचे विजयी पुनरागमन तर मॅकगर्कचे झंझावाती पदार्पण

पुनरागमनानंतर कुलदीप यादवच्या फिरकीने पहिल्याच षटकात केलेली करामत आणि आयपीएल पदार्पणातच ‘षटकार’बाजी करत ठोकलेल्या 55 धावांच्या झंझावाती खेळीने सलग दोन पराभवानंतर विजय मिळवून दिला. विजयानंतर नवव्या स्थानावर असलेल्या दिल्लीने लखनऊचा 11 चेंडू आणि 6 विकेट राखून ‘जायंट’ पराभव केला. लखनऊला विजयाच्या हॅटट्रिकनंतर आज दारूण पराभव पत्करावा लागला. त्यांना दिल्लीच्या डावात एकदाही सामन्यावर पकड घेता आली नाही.

आयुष बदोनीच्या झुंजार खेळीमुळे लखनऊने दिल्लीपुढे 168 धावांचे आव्हान ठेवले, पण आपला पहिलाच आयपीएल सामना खेळत असलेल्या 22 वर्षीय जेक फ्रेझर-मॅकगर्कने 5 षटकारांचा वर्षाव करत 35 चेंडूंत 55 धावा चोपून काढत 15 व्या षटकातच दिल्लीचा विजय निश्चित केला. कर्णधार ऋषभ पंतनेही आपल्या झंझावाती फलंदाजीतले सातत्य दाखवताना 24 चेंडूंत 41 धावा काढल्या. मॅकगर्क आणि पंतने तिसऱया विकेटसाठी 77 धावांची भागी रचत विजयाचा पाया रचला तर त्यांच्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि शाय होपने संघाच्या विजयावर 19 व्या षटकांत शिक्कामोर्तब केले. त्याआधी पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने जोरदार सुरूवात केली, पण वॉर्नर (8) आजही लवकर बाद झाला. पृथ्वीने 32 धावांची खेळी करताना 6 चौकार लगावले होते.

तत्पूर्वी कुलदीप यादवची प्रभावी फिरकी आणि आघाडीवीरांच्या अपयशी फलंदाजीमुळे लखनऊने 94 धावांतच आपले 7 फलंदाज गमावले होते. तरीही तळाला येऊन दिल्लीच्या गोलंदाजांना आयुष बदोनीने बदडल्यामुळे लखनऊला 7 बाद 167 अशी मजल मारता आली होती.

13 षटकांत लखनऊने केवळ 94 धावा काढल्या होत्या आणि त्यांचे सारे रथी-महारथी बाद झाले होते. तेव्हा आयुष बदोनीने अर्शद खानसह लखनऊचा धावफलकच फिरवून टाकला. दोघांनी शेवटची 7 षटके झुंजार खेळ करत 73 धावांची अभेद्य भागी रचत सर्वांनाच तोंडात बोटे घालायला भाग पाडले. बदोनीने 35 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 55 धावांची जबरदस्त नाबाद खेळी साकारली. त्याला अर्शद खानने 20 धावा करत सुरेख साथ दिली.

कुलदीपचा प्रभावी मारा

खलील अहमदने सुरुवातीचे दोन फलंदाज बाद करत दिल्लीला अपेक्षित सुरुवात करून दिली होती. कर्णधार लोकेश राहुल दिल्लीवर तुटून पडला होता. तेव्हाच दुखापतीमुळे गेले दोन सामने संघात नसलेल्या कुलदीप यादवने येताच धमाका केला. त्याने आपल्या पहिल्याच षटकांत तिसऱया चेंडूवर मार्कस स्टॉयनिसला (8) बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर निकोलस पूरनचा त्रिफळा उडवून खळबळ माजवली. त्याला हॅटट्रिकची संधी होती, पण दीपक हुडाने ती पूर्ण होऊ दिली नाही. कुलदीपने पहिल्याच षटकात 3 धावांत 2 विकेट टिपल्या. तो तिथेच थांबला नाही, त्याने आपल्या दुसऱयाच षटकात लोकेश राहुलला (39) बाद करत 5 बाद 77 अशी दुर्दशा केली. मग हुडा आणि कृणाल पंडय़ाही विकेट गमावून बसले. कुलदीपने जबरदस्त कमबॅक करताना 20 धावांत 3 विकेट टिपत लखनऊची केविलवाणी अवस्था केली, पण बदोनी-अर्शद खानच्या भागीमुळे त्यांना दिल्लीसमोर आपले आव्हान उभे करता आले होते.