दिल्ली डायरी – कुमारस्वामींचे ‘इमोशनल कार्ड’ चालेल का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापि दीडेक वर्षाचा कालावधी आहे, मात्र ही निवडणूक आपल्या राजकीय आयुष्यातील अखेरची निवडणूक असेल, असे ‘इमोशनल कार्ड’ कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी खेळले आहेत. अर्थात अशी घोषणा केली म्हणजे कुमारस्वामी वानप्रस्थाश्रमात जातील, असे समजण्याचे कारण नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नेतृत्वबदल करूनही भाजपची पीछेहाट झाली. त्यामुळे विधानसभेसाठी कुमारस्वामींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. म्हणूनच विधानसभेच्या ‘बाजारात तुरी’ असताना, कुमारस्वामींनी ‘इमोशनल कार्डची मारामारी’ सुरू केली आहे.

कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान देवगौडा यांचे चिरंजीव. पितापुत्रांच्या नावे कर्नाटकाचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम आहे, मात्र जनतेने पितापुत्रांच्या धोरणांना कंटाळून गेल्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान राहिलेल्या देवगौडांना पराभूत केले. तरीही देवगौडा मागच्या दाराने राज्यसभेत पोहोचले. 80वर्षे पार केलेले देवगौडा निवृत्तीची भाषा करत नाहीत, मात्र त्यांचे तुलनेने ‘तरुण’ असलेले चिरंजीव कुमारस्वामी हे ‘राजकीय निवृत्ती’ची भाषा करत आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे संपूर्ण बहुमताचे सरकार कर्नाटकात सत्तेवर यावे, अशी देवगौडांची अखेरची इच्छा असल्याचेही कुमारस्वामींनी नमूद केले आहे. देवगौडांची कितीही इच्छा असली तरी कर्नाटकातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ते शक्य नाही, हे कुमारस्वामींनाही माहिती आहे, मात्र वर्षानुवर्षे मतपेढी असलेला वक्कलिंग समाजही आता साथ देईनासा झाल्यानंतर कुमारस्वामींनी फावल्या वेळात हे इमोशनल कार्ड फेकले आहे. देवगौडा मुख्यमंत्री झाले तेव्हा एकत्रित असलेला जनता दल हा देशातील महत्त्वाचा राजकीय पक्ष होता, तर कुमारस्वामी काँग्रेसच्या टेकूवर मुख्यमंत्री बनले होते, हा नजीकचा इतिहास आहे. सध्या कुमारस्वामींना काँगेसही धूप घालत नाही आणि भाजपही ढुंकून पाहत नाही. अशा परिस्थितीत आपले अस्तित्व दाखविण्यासाठी व टिकविण्यासाठी कुमारस्वामींनी धडपड सुरू केली आहे. त्यात वावगे असे काही नाही, मात्र इमोशनल कार्ड जरा बेताने फेकले तर त्याचे हसे होत नाही इतकेच. आपल्या देशात जनतेने बळेबळे निवृत्त करायचे म्हटले तरी राजकारणी निवृत्त होत नाहीत. तेव्हा कुमारस्वामींनी निवृत्तीची भाषा करणे म्हणजे धूळफेकच आहे. कुमारस्वामी काही निवृत्त होणार नाहीत आणि देवगौडांच्या इच्छेखातर कर्नाटकात काही त्यांच्या पक्षाचे सरकार पूर्ण बहुमताने येणार नाही, मात्र निसटू पाहत असलेली वक्कलिंग व्होट बँक मात्र या इमोशनल कार्डाद्वारे थांबू शकते. कुमारस्वामींचे इमोशनल कार्ड चालते की नाही ते पुढे दिसेलच!

पाय लागू अण्णा!

प्रशासनाची ‘स्टील फ्रेम’ असते आणि प्रशासनाने राज्यकर्ते कुणीही असोत, आपला कणा हा ताठ ठेवला पाहिजे असे अपेक्षित असते, मात्र अपेक्षेनुसार आपल्या देशात घडतेच असे नाही. नजीकच्या काळात तर अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून राजकीय उद्दिष्टे साध्य केल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे पुढे पुढे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांदी होते आणि खरोखरीच कर्तबगार असणारे अधिकारी कुवत असूनही मागे पडतात. संपूर्ण देशातच ही शोकांतिका आहे. अधिकाऱ्याच्या खुशामतगिरीचे असेच अनोखे उदाहरण सध्या तेलंगणात चर्चेत आहे. सिद्दपेटचे जिल्हाधिकारी वेंकटरामी रेड्डी यांनी सेवानिवृत्त होण्याच्या एक वर्षअगोदर प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला, मात्र राजीनामा देण्यापूर्वी रेड्डी महाशयांनी जी करामत केली त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव एका शासकीय कार्यक्रमासाठी आले असताना या रेड्डींनी सर्वांसमक्ष ‘पाय लागू अण्णा’ म्हणत सर्वांसमक्ष पाय धरले होते. ते इतके भक्कम की रेड्डींच्या ‘घालीन लोटांगण’मधून सुटका करण्यासाठी चंद्रशेखर रावांना कसरत करावी लागली. प्रत्येक अधिकाऱ्याला प्रोटोकॉलनुसार राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांचा आदर व सन्मान हा करावाच लागतो आणि तो नियमाला धरूनही आहे, मात्र थेट पाया पडण्याचा प्रकार हा भलताच विलक्षण होता! पुढे पुढे करणारे अधिकारी खासगीत असे पाया पडत असतातच, मात्र सर्वांसमक्ष पाय धरण्याचा पराक्रम रेड्डींनी करून दाखविला. प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर रेड्डींनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची तोंड फाटोस्तोर स्तुती केली आहे. पाया पडल्याची बक्षिसी म्हणून लवकरच या वेंकटरामींची तेंगलणा राष्ट्र समितीच्या वतीने विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

मनसुखभाई मांडविया यांचे साधेपण

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेल्यानंतर त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल केल्यामुळे देशाचे नवे आरोग्य मंत्री मनसुखभाई मांडविया विरोधकांच्या चांगलेच रडारवर होते. देशभरातून मांडविया यांच्यावर मोठी टीका झाली व ती रास्तही होती, मात्र सूर्यास्तानंतर शवविच्छेदनाला परवानगी देण्याचा एक चांगला निर्णयही मांडविया यांनी घेतला आहे. त्याबद्दलही त्यांचे कौतुक व्हायला हवे. मांडविया या निर्णयामुळे चर्चेत आहेतच, पण त्याहीपेक्षा एका विलक्षण घटनेमुळे ते चर्चेत आले आहेत. तसे पाहिले तर मनसुखभाई हे मेहनती आहेत. फारसे शिक्षण नसतानाही देशाच्या आरोग्यमंत्रीपदापर्यंतची त्यांची झेप ही मेहनतीचे फळ आहे. संसदेतही ते सायकलवर येत असत. अर्जुनराम मेघवाल, मनसुखभाई मांडविया आणि डॉ. विकास महात्मे हे भाजप खासदारांचे त्रिकुट संसदेत सायकलवर नियमितपणे यायचे. यापैकी महात्मे वगळता इतर दोघे मंत्री झाले, मात्र हा साधेपणा कधी कधी भलताच अंगाशी येतो. आरोग्यमंत्री झाल्यानंतर ओळख न दाखविता ‘एम्स’मध्ये नेमके काम कसे चालते, बऱ्याच तक्रारी येत असल्याने मनसुखभाईंनी एम्सला एक ‘आम आदमी’ म्हणून अचानक भेट देण्याचे ठरविले. त्यामागचा त्यांचा हेतू प्रामाणिकच होता, मात्र देशातील आरोग्य व्यवस्था किती निर्ढावलेली आहे त्याचा प्रत्यय त्यांना आला, तो असा की, एम्सच्या गेटमधून सुरक्षा रक्षक मनसुखभाईंना काही केल्या आत सोडेना. आत गेल्याशिवाय ‘कारभार’ कसा पाहणार? त्यामुळे बराच वेळा सुरक्षा रक्षकाबरोबर हुज्जत घालूनही उपयोग होत नसल्याचे पाहून अखेर मनसुखभाईंना आपली ‘खरी ओळख’ सांगावी लागली. त्यानंतर त्यांना ‘आत’मध्ये प्रवेश मिळाला, मात्र ‘एम्सचा कारभार’ काही पाहता आला नाही. अर्थात मनसुखभाईंनी या अनुभवाने साधेपणाचा धसका घेतला आहे. कोणत्याही ठिकाणी भेटीपूर्वी आता तिथल्या प्रशासनाला ‘अवगत’ करूनच मनसुखभाई जातात!