
>> नीलेश कुलकर्णी
वायू प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने यंदाच्या दिवाळीत ‘ग्रीन फटाके’ फोडण्याचा आदेश दिल्लीकरांना दिला. अर्थात हे फटाके फुटण्याआधीच सिग्नेचर पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राजकीय श्रेयवादाचे फटाके फुटले. पुलाच्या उद्घाटनावेळी भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांना आम आदमी पार्टीचे आमदार अमानुत्तला खान यांनी खाली ढकलले. त्याच वेळी तिवारी यांनी आपचे कार्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडल्याचे फोटोही ‘आप’कडून व्हायरल झाले. दिवाळीपूर्वीच दिल्लीकरांना भाजप विरुद्ध आप हा नेहमीचा ‘शिमगा’ वेगळ्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला.
राजधानी दिल्लीतील सिग्नेचर पुलाच्या निर्मितीचे श्रेय आज आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेत आहेत. त्याचवेळी भाजपदेखील या श्रेयवादाच्या लढाईत उतरल्याचे दिसत आहे. मात्र मुळात या पुलाची मूळ संकल्पना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांची. 2004 मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. 2010 पूर्वीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांपूर्वी हा पूल बांधून होणे अपेक्षित होते. मात्र नेहमीप्रमाणे या पुलाखालूनही भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिली आणि या पुलालाही तब्बल चौदा वर्षांचा वनवास लाभला. आता अखेर तो वनवास संपला.
‘आम्ही सिग्नेचर पुलाचा वनवास संपवला’ अशी टिमकी वाजवत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या फिरत आहेत. त्यात अतिउत्साहाच्या भरात त्यांनी सिग्नेचर पुलाऐवजी नेदरलॅंडच्या पुलाचा फोटो ट्विटरवरून व्हायरल केला. त्यामुळे केजरीवालांचे सर्वत्र भलतेच हसू झाले. ही नौटंकी कमी वाटावी म्हणून की काय, प्रत्यक्षात सिग्नेचर पुलावर भाजपवाले व आपवाले यांच्यात श्रेयासाठी जी गुद्दागुद्दी झाली ती दिल्लीकरांनाही लाज आणणारी आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजत असल्याने ही हाणामारी भविष्यात अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. प्रदूषणाच्या गॅस चेंबरपासून दिल्लीकर मुक्त होतीलही. मात्र या राजकीय प्रदूषणाचे काय? हा प्रश्न कायम राहणार असे दिसते.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल जनतेची सहानुभूती मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यात मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा तसेच गरीबांसाठी वीज आणि पाण्याबाबतच्या धोरणामुळे आपची व्होट बॅंक मजबूत झाली आहे. भाजपचे हेच मुख्य दुखणे आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात 47 टक्के जनतेने मुख्यमंत्री पदासाठी केजरीवालांना पाठिंबा दर्शविला आहे. केजरीवालांना पुरून उरेल असा नेता प्रदेश पातळीवर भाजपकडे नाही हे वास्तव आहे. नौटंकीच्या बाबतीत भाजपवाले पीएचडी असतील तर केजरीवाल हे पीएचडीचे गाईड आहेत. केजरीवालांचा बंदोबस्त करण्यासाठी भाजपने नेतृत्वाने आजवर काय नाही केले? मात्र ती प्रत्येक खेळी आजवर ‘बूमरॅंग’ ठरली आहे. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित ठेवण्यात भाजप नेतृत्व यशस्वी ठरले हीच जमेची बाजू. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागांवर भाजपचा झेंडा फडकला होता. मात्र यावेळी परिस्थिती उलटी होण्याची चिन्हे आहेत. त्यातच भाजप नेतृत्वाविरुद्ध बंडखोरीची शॉटगन डागणारे शत्रुघ्न व यशवंत या दोन सिन्हांना दिल्लीतून भाजपविरोधात रिंगणात उतरविण्याचा केजरीवाल यांचा मनसुबा आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. मनोज तिवारी आणि अमानुतल्ला खान यांच्यातील हाणामारी हा केवळ ट्रेलर आहे. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा खरा ‘पिक्चर’ रंगणार आहे.
मेहुणे मेहुणे मेव्हण्याचे पाव्हणे!
राजकारणात साधू यादव यांच्या रूपाने मेहुण्याचा कटू अनुभव लालू यादव यांनी घेतला. आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यावर ‘मेहुणे मेहुणे मेव्हण्याचे पाव्हणे’ असे म्हणायची वेळ आली आहे ती त्यांचे सख्खे मेहुणे संजयसिंग यांच्यामुळे. ‘शिवराज जिजाजीं’ना विधानसभेचे इलेक्शन अगोदरच जड जात असताना या संजय सिंगांनी थेट कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून खळबळ उडवून दिली आहे. मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांच्या विकास पुरुष या इमेजच्या पडद्याआड त्यांच्या पत्नी साधना व मेहुणे संजय सगळ्या करामती करायचे अशी वंदता राजकीय वर्तुळात आहे. निवडणुकीच्या तोंडावर या संजय सिंगांना वश करून कॉंग्रेसकडून तिकीट देऊन कमलनाथांनी सध्या तरी बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंगेसने शिवराज यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांना उतरवले आहे. त्यामुळे शिवराज यांची दमछाक होत आहे. त्याचवेळी भाजप नेतृत्वाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनाही विधानसभेच्या रिंगणात उतरवल्याने शिवराजमामांच्या पाडावाचा ‘प्लॅन’ दिल्लीतून तर ठरला नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत सख्ख्या मेहुण्याने बंड केल्याने शिवराजमामा अडचणीत सापडले आहेत. शिवराज हे सबंध मध्य प्रदेशात ‘शिवराजमामा’ या टोपणनावाने लोकप्रिय आहेत. मात्र यानिमित्ताने कॉंग्रेसने त्यांच्यावर टीकेची राळ उडवली आहे. ‘‘शिवराज सिंग आपल्या सख्ख्या मेहुण्याच्या मुलांचेही ‘मामा’ बनू शकले नाहीत ते राज्याचे काय शिवराजमामा बनणार?’’ असा सवाल कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. राजकीय चक्रव्यूहात अडकलेले शिवराज त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात ते दिसेलच.































































