
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली
सरकारने नुकतीच बंदी घातलेल्या जम्मू आणि कश्मीरातील जमाते इस्लामी’ या फुटीरतावादी संघटनेचे पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर यंत्रणेशी साटेलोटे आहे; तसेच जमाते इस्लामी संघटनेचे नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी नियमित संपर्क होता. सदर संघटनेतर्फे जम्मू-कश्मीरात विभाजनवादाला चिथावणी दिली जात होती, अशी माहिती पुढे आली आहे.
जमाते इस्लामी संघटनेने हुरियत कॉन्फरन्सचा सईद अली शाह गिलानी याला जम्मू आणि कश्मीरचा जिहादप्रमुख (अमीर-ए-जिहाद) असा दर्जा दिला होता. कश्मिरी युवकांना शस्त्र्पुरवठा, प्रशिक्षण देण्यात पाकिस्तानची आयएसआय सदर संघटनेतर्फे काम करीत होती. या संघटनेचे नेते दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तांशी नियमित संपर्कात होते, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱयाने सांगितले.
जमाते इस्लामी आपल्या शाळांच्या नेटवर्कद्वारे कश्मीर खोऱयातील मुलांमध्ये हिंदुस्थानविरोधी भावना फैलावण्याचे काम करीत होती. ‘जमीयत उल तुलबा’ ही युवा शाखा तरुणांना जिहादसाठी चिथावणी देऊन त्यांना दहशतवादी संघटनेत दाखल करीत असे.
पाकिस्तानस्थित हिजबुल मुजाहिदीन आणि त्याच्या टेरर फंडिंग करणाऱया नेत्यांनी पसरवलेल्या भीतीचा बागुलबुवा दाखवून ‘जमाते इस्लामी’ने कश्मिरातील स्थानिक आणि परदेशात प्रशिक्षण घेणाऱया दहशतवाद्यांना निधी पुरविला.
‘जमाते इस्लामी’तर्फे कट्टर इस्लामचे धार्मिकचे शिक्षण देणाऱया शाळा कश्मिरात चालविण्यात येत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अनेक दहशतवादी गट काम करीत असून, गिलानी हा कश्मिरातील दहशतवादाला सदैव खतपाणी घालीत असतो. तो घुसखोरांना स्वातंत्र्यसैनिक म्हणवतो, असे अधिकाऱयांनी सांगितले.
तिसऱयांदा बंदी
सरकारने जमाते इस्लामी संघटनेवर दोनवेळा बंदी घातली होती. 1975 मध्ये दोन वर्षांसाठी जम्मू आणि कश्मीर सरकारने, तर 1990 मध्ये गृहमंत्री मुफ्ती मेहमूद सईद असताना तीन वर्षांसाठी केंद्र सरकारने जमाते इस्लामीवर बंदी घातली. आता केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी रोजी जमातेवर पुन्हा बंदी घातली आहे.
कश्मीरात मुस्लिम राज्य स्थापनेचे दिवास्वप्न
‘जमात-ए-इस्लामी हिंद’ संघटेची उपसंघटना म्हणून जमाते इस्लामीची 1945 मध्ये स्थापना झाली. मात्र, राजकीय विचारांवरून मतभेद झाल्यामुळे ही संघटना 1953 मध्ये वेगळी झाली. सदर सघंटनेने निवडणूक प्रक्रियेला विरोध केला आहे. सरकार अस्थिर करून कश्मीरात मुस्लिम राज्य स्थापन करण्याचे दिवास्वप्न तो पाहत आहे.




























































