
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळय़ात ‘ईडी’ तोंडावर आपटली आहे. या घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंगप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींविरोधात ‘ईडी’कडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. म्हणून त्या दोघांना राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
‘ईडी’ने 7 फेब्रुवारी रोजी गौतम मल्होत्रा आणि 8 फेब्रुवारीला राजेश जोशी या दोघांना अटक केली होती. ईडीने न्यायालयात सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या दोघांचीही नावे होती. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी या दोन्ही आरोपींना सबळ पुराव्याअभावी जामीन मंजूर केला. आपल्या 85 पानांच्या आदेशपत्रात न्यायालयाने ‘ईडी’च्या तपासाची पोलखोल केली असून कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मद्य धोरण घोटाळय़ातून पहिल्यांदाच कुणाला तरी जामीन मिळाला आहे. मल्होत्रा आणि जोशी यांची दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश न्या. नागपाल यांनी दिले आहेत. मल्होत्रा यांच्यातर्फे अॅड. विजय बिष्णोई, तर जोशी यांच्यातर्फे अॅड. रजत भारद्वाज यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
‘ईडी’चा आरोप
मद्य घोटाळय़ातील पैसा ‘आप’ने गोवा निवडणुकीत वापरला असा ‘ईडी’चा आरोप आहे. मात्र ‘ईडी’ने फक्त साक्षीदारांच्या सांगोवांगीवर भरवसा ठेवून आरोपपत्र दाखल केले. आर्थिक व्यवहार झाल्याचा, लाच घेतल्याचा कोणताच पुरावा ईडी सादर करू शकली नाही. न्यायालयाच्या आदेशात हे स्पष्टपणे नमूद असल्याचे ‘आप’ने म्हटले आहे.
भाजपने माफी मागावी
‘आप’ची बदनामी करणाऱया भाजपने आता माफी मागावी, अशी मागणी दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी केली आहे. ‘ईडी’ने 100 कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप केला आहे. मात्र 100 कोटी सोडा, 30 कोटी सोडा, एक नव्या पैशाचाही घोटाळा झालेला नाही, असे आतिशी यांनी ठामपणे सांगितले. दारू घोटाळय़ाचे आरोप करणारे भाजपचे नेते आता असा घोटाळा झालाच नाही असे म्हणतील का? ज्या टीव्ही चॅनल्सवरून याच्या बातम्या वर्षभर चालतात ते या बातम्या काढून टाकतील का, असा सवालही त्यांनी केला.






















































