बुरहान वाणीसाठी कश्मीर बंद, अमरनाथ यात्रेवर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

दहशतवादी बुरहान वाणीच्या दुसऱ्या वर्षश्राद्धानिमित्त फुटीरतावाद्यांनी कश्मीरमध्ये बंद पुकारला आहे. यामुळे येथील वातावरण तापले असून कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर कश्मीर खोऱ्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रेस जाणाऱ्या भाविकांना आहेत त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय पोलीस आणि प्रशासनाने रविवारी रात्री घेतला. त्यामुळे यात्रेस निघालेल्या बऱ्याच भाविकांना यात्रा थांबवण्यात येत असल्याची कल्पनाही नव्हती. भक्त निवासात तब्बल चार हजाराहून अधिक भाविकांनी मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही बुरहान वाणीच्या पहिल्या वर्षश्राद्धदिनी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती.

तर दुसरीकडे 45 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ 1 जुलै रोजी झाला. 15 ऑगस्टला या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेनिमित्त अद्यापपर्यंत 90 नागरिकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे.