पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप, नवज्योत सिंह सिद्धू यांचा तडकाफडकी राजीनामा

107

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी 10 जून रोजी आपला राजीनामा तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे दिला होता. पण त्याचा खुलासा त्यांनी आज टि्वटरवर केला आहे. यात त्यांनी आपला राजीनामा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पाठवत असल्याचे म्हटले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्यात सर्वकाही आलबेल नव्हते. लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. या अपयशाचे खापर अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांच्यावर फोडले होते. तसेच सिद्धू यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली होती. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकांनंतर 6 जुलै रोजी झालेल्या बैठकीत सिद्धू यांच्यासह अनेक मंत्र्यांचे विभागच बदलले होते. तेव्हापासूनच दोघांमध्ये वरचेवरच खटके उडत असल्याची चर्चा होती. सिद्धू यांनी ते पद कधीही स्वीकारले नाही. विभागाच्या एकाही बैठकीत ते सहभागी झाले नाही.

तेव्हापासूनच सिद्धू यांच्या पुढे काय होणार अशी चिंता त्यांच्या चाहत्यांना होती. त्यानंतर सिद्धू यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. या सर्व चर्चेला पूर्णविराम देत सिद्धू यांनी राजीनामा दिला. गेल्या वेळी झालेल्या बैठकीतही सिदू्ध यांच्याजवळील पर्यटन खाते काढून घेण्यात आले होते.

दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा राज्यपाल यांच्याकडे न देता तत्कालिन काँग्रेस अध्यक्षांना पाठवला. यामुळे पक्षश्रेष्ठी सिद्धू यांचा राजीनामा मंजूर करणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या