फसलेली नोटाबंदी, दिल्लीत 62 लाख रुपयांच्या जुन्या नोटांचे घबाड सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय फसल्याचे अनेकदा समोर आले आहे. सहा वर्षांपूर्वी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार केल्या असल्या तरी त्यांची आजही चलती असल्याचे दिसत आहे. दिल्लीच्या लक्ष्मीनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करत तब्बल 62 लाख रुपये किमतीच्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांची करकरीत बंडले जप्त केली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली असून या नोटा कुठे चालतात, असा सवाल केला जात आहे.

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. मात्र दिल्लीत 62 लाख रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, 14 लाख रुपयांच्या नव्या नोटांच्या माध्यमातून 62 लाखांच्या जुन्या नोटा खरेदी केल्या असून पुढे 20 लाख घेऊन त्या विकल्या जाणार असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. मात्र त्या नोटा कोणाच्या आहेत, कुठे घेऊन जाणार होते याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, या प्रकारची सोशल मीडियावर नेटकऱयांकडून खिल्ली उडवली जात असून काही स्मार्ट लोकं मोठा खेळ खेळत असल्याची मिम्स व्हायरल होत आहेत.

काँग्रेसकडून सखोल चौकशीची मागणी

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सहा वर्षांनी लाखो रुपयांच्या जुन्या नोटा सापडण्याचा प्रकार भयंकर असल्याचे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. सरकारी आकडेवारीनुसार 99.9 टक्के जुन्या नोटा बँकेत जमा झाल्या असून उर्वरित 0.1 टक्के नोटा बाजारात आहेत. हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोका असून सरकारने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.