
दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. या हल्ल्यात शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तरीही न डगमगता त्यांच्यासमोर धीटपणे उभा राहून मारो मारो असे म्हणणारा तरुण सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा तरुण नागपूरचा आहे. भारत बानाईत असे या जिगरबाज तरुणाचे नाव आहे.
दिल्लीतील कालच्या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसह आयआयटीयन, डॉक्टरसुद्धा उपस्थित होते. या आंदोलनासाठी भारत बानाईत हा दिल्लीला गेला होता. परंतु पोलिसांनी अचानक लाठीमार केला. यावेळी त्याला पोलिसांनी घेरले आणि मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्याला न जुमानता त्याने पोलिसांनाच ‘मारो मारो’ म्हणत होता. तसेच ‘मला मारून टाका सर’ असं म्हणत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा संदेश देत होता.
हक्कासाठी लढणाऱयांवर लाठीमाराची गरज काय?
भारत बानाईतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आंदोलनात गेलेले सगळे विद्यार्थी आहेत. ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्यावर लाठीमार करण्याची गरज काय आहे? असे भारतच्या वडिलांनी म्हटले आहे. तर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारायला नको होते, असे त्याच्या आईने म्हटले आहे. माझ्या मुलानेच मला लाठीमार झाल्याचे सांगितले.





























































