फसवणूकप्रकरणी आमदार बबन शिंदेंच्या मुलाला सहा महिन्यांची शिक्षा, दिल्ली साकेत न्यायालयाचा आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फूड कंपनीची साडेसात कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना सहा महिने कैदेची शिक्षा दिल्लीच्या साकेत न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी ट्विंकल चावला यांनी सुनावली आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे रणजितसिंह शिंदेंचे काका आहेत. न्यायालयाच्या या जबर झटक्याने जिह्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्याबरोबर रणजित बोरावके या सहकाऱयालाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याचबरोबर महिनाभरात साडेसात कोटी रुपये तक्रारदाराला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह सध्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांची कर्नाटकात इंडियन शुगर कंपनी आहे. या शुगर कंपनीने सैनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर साखर पुरविण्याबाबत करार केला होता. या करारापोटी 5200 टन साखर पुरण्यात येणार होती. त्यापोटी फूड कंपनीकडून 10 कोटी रुपये आगाऊ घेतले होते. परंतु 2016-17 मध्ये फक्त 1942 टन साखर देण्यात आली. त्यामुळे इंडियन शुगरकडून 8 कोटी 39 लाख रुपये फूड कंपनीला देणे होते. त्यासाठी इंडियन शुगरकडून सिंडिकेट बँकेचा पाच कोटी रुपयांचा धनादेश सैनिक फूड कंपनीला देण्यात आला होता; परंतु हा धनादेश रक्कम नसल्याने वटला नाही.

सैनिक फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने रणजितसिंह शिंदे व त्यांचा सहकारी रणजित बोरावके या दोघांविरुद्ध दिल्लीच्या साकेत न्यायालयात साडेसात कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केला होता. यावर सुनावणी होऊन न्यायदंडाधिकारी ट्विंकल चावला यांनी शिंदे व बोरावके या दोघांना सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच तीस दिवसांत साडेसात कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे सोलापूर जिह्यातील दोघा आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला जबर धक्का बसला आहे.